होय! तेजस ठाकरे राजकारणात येतोय!

युवासेनेचा राज्यस्तरीय मेळावा होईल तेव्हा राज्य पातळीवरील कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यावेळी युवासेनेच्या प्रमुख पदी तेजस ठाकरे यांना विराजमान करून त्यांचे लॉन्चिंग केले जाईल, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

155

शिवसेनेचे नेतृत्व करणाऱ्या ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील आणखी एक व्यक्ती नेता म्हणून समोर येणार आहे, असे संकेत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे बंधू तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक सामनामध्ये पहिल्या पानावर नार्वेकर यांची तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भलीमोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये तेजस ठाकरे यांना ‘ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, अशा शब्दांत नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनाप्रमुखांनीच दिलेले संकेत! 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या वयोमानानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. बाळासाहेबांच्या हयातीतच उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीच्या कामात सक्रिय सहभाग घेणे सुरु केले. त्यानंतर बाळासाहेबांच्याच समोर ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकरणात सक्रिय झाली. ज्या सभेत आदित्य ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते तलवार देऊन आदित्य ठाकरे यांचे लॉन्चिंग करण्यात आले. त्याच सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण करताना, आदित्य जरी पुढे येत असला तरी तेजसमध्ये माझा आक्रमकपणा तुम्हाला पाहायला मिळेल, असे म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांच्यात शिवसेनेला साजेसे राजकीय गुण असल्याची जणू खात्रीच दिली होती.

(हेही वाचा : २०२२च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा ‘आदित्योदय’)

युवासेनेचे नेतृत्व मिळणार!  

सध्या युवासेनेच्या प्रमुखपदी आदित्य ठाकरे आहेत. मात्र आज शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना बऱ्यापैकी राजकारणात स्थिरस्थावर केले आहे. राज्यस्तरीय नेतृत्व करणारा नेता म्हणून आदित्य ठाकरेंची ओळख निर्माण झाली आहे. राजकारणात आदित्य आता पुढे गेले असल्याने युवासेनेची धुरा कुणाच्या खांद्यावर सोपवायची, अशी चर्चा जेव्हा सुरु झाली तेव्हा तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशावर चर्चा सुरु झाली आहे. सध्या राज्यभरात युवासेनेचे जिल्हा, तालुका स्तरीय मेळावे सुरु आहेत. त्यामध्ये नव्याने कार्यकारिणी जाहीर केली जात आहे. युवासेनेचा शेवटचा मेळावा जेव्हा होईल, तेव्हा राज्यस्तरीय कार्यकारिणीची घोषणा होईल, त्यावेळी युवासेनेच्या प्रमुख पदी तेजस ठाकरे यांना विराजमान करून त्यांचे लॉन्चिंग केले जाईल, अशीही चर्चा आहे. अन्यथा आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि मावस भाऊ वरून सरदेसाई यांना प्रमुखपदी नियुक्त करून सरचिटणीस पदावर मात्र तेजस ठाकरे यांना नियुक्त करून तेजस हे कायम प्रकाशझोतात कसे राहतील, याची तरतूद ठाकरे कुटुंबाकडून केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तेजस यांची एन्ट्री! 

आदित्य ठाकरे हे स्वभावाने मृदू आहेत, मात्र शिवसेनेतील आक्रमकपणा हा तेजस ठाकरे यांच्याकडे असल्याने जरी बदलत्या शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे पर्याय असले तरी सेनेच्या मूळ ढाच्याला साजेसे नेतृत्व म्हणून तेजस ठाकरे यांची राजकारणातील एन्ट्री यामुळे मृदू स्वभावाचे आदित्य आणि आक्रमक स्वभावाचे तेजस या दोघांचा शिवसेनेला आगामी राजकरणात दुधारी तलवार म्हणून वापर करता येईल, त्याचा सेनेला फायदाच होईल, असेही बोलले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तेजस ठाकरे यांना राजकरणात प्रवेश देऊन त्यांचा आधी मुंबईच्या राजकारणात सहभाग वाढवण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.