महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्वाचा वाद म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे होणार शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे होणार? हा विषय चर्चेत होता. अखेर १७ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदे यांची झाली आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या असून उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात याविषयी संबोधित करण्यासाठी सभा घेतली.
( हेही वाचा : “उद्धवसाहेब वडिलांची प्रतिष्ठा आणि ठाकरेंचे वलय घालवून तुम्ही काय मिळवलत?” मनसे नेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत)
…पण शिवसेनेचे कुटुंब नको
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने उद्धव ठाकरेंनी सर्व नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांची मातोश्रीवर तातडीने बैठक बोलावली यानंतर कलानगर येथे त्यांनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “या चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे या दिवसांचा मुहूर्त पाहून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह चोरलं गेलं आहे. ज्यांनी चोरलं त्यांना माहिती नाही की, त्यांनी मधामाशाच्या पोळ्यावर दगड मारला आहे, आजवर तुम्ही मधमाशीच्या मधाचा स्वाद घेतलात पण तुम्हाला डंक मारायची वेळ आता आलेली आहे. भाजप आणि पंतप्रधानांनी जोडलेल्या सरकारी यंत्रणा अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपतील पण शिवसेना संपवता येणं हे शक्य नाही. शिवसेना कोणाची हे निवडणूक आयुक्तांनी त्यांच्या मालकाच्या आदेशावरून सांगितले आणि गुलामी केली. कोणालाही विचारा शिवसेना कोणाची आहे? यांना ठाकरे नाव, बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे पण शिवसेनेचे कुटुंब नको आहे.”
रावणाने सुद्धा धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण काय झालं?
ते पुढे म्हणाले, “एवढे दिवस जनता मोदींचे मुखवटे घालून सभेला येत होती आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे. यातचं आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही त्यांना माहितीये मुखवटा कोणता आणि असली चेहरा कोणता आहे. ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव आणि पवित्र धनुष्यबाण चोरांना दिला, आणि आता यांच्या कपटामुळे मशाल निशाणी सुद्धा जाऊ शकते. जर मर्द असाल तर चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या… मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो बघूया महाराष्ट्राची जनता कोणाला साथ देते” असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे. रावणाने सुद्धा धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण काय झालं? तो उताणा पडला अगदी तसेच हे चोरबाजाराचे मालक सुद्धा उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत. असा विश्वास व्यक्त केला आहे.
“फेसबुक लाईव्ह घेऊन निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व गोष्टींची आम्ही कशी पूर्तता केली हे मी सांगेन गेल्या ७५ वर्षांमध्ये असे केव्हाच घडले नव्हते ते काम पंतप्रधानांच्या गुलाम निवडणूक आयुक्तांनी केले आहे.” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे.
Join Our WhatsApp Community