बाबरीवरून महाआघाडीचे ‘पतन’?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बाबरी मशीद पडल्याचे समर्थन करणे अयोग्य होते. याची मुस्लिम नेत्यांना लाज वाटायला हवी होती. महाविकासआघाडीतील  सर्व मुस्लिम आमदारांनी निषेध करुन राजीनामे द्यावेत, असे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर तुटून पडले. त्वेषाने बोलताना ते सेनेचे हिंदुत्व सिद्ध करू लागले आणि बाबरी मशिदीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनाप्रमुख यांनी ‘जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे’, असे म्हटले होते. याची आठवण मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी करून दिली. मात्र त्यानंतर त्याचे भलतेच पडसाद उमटले. महाआघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी याचा निषेध करत, या प्रकरणी महाआघाडीतील सर्व मुस्लिम आमदारांनी राजीनामा देण्याचे आवाहन केले, तर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी हा किमान सामान कार्यक्रमाचा भाग होता का, असे सांगत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले. यामुळे बाबरी विषयावरून आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत त्यांच्या भाषणात बाबरी मशीद पाडल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आणि यावरूनच सपाचे आमदार अबू आझमी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचे विधान गंभीर असून सर्व आमदारांनी राजीनामे द्यावे, असे आवाहन अबू आझमी यांनी केले. उद्धव ठाकरे आता शिवसेनेचे नेते नसून आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सल्लाही अबू आझमी यांनी दिला.

(हेही वाचा : ‘जय श्रीराम’ ला ममतांचा विरोध तरी सेनेचा सपोर्ट! )

महाआघाडीतील सर्व मुस्लिम आमदारांनी राजीनामा द्यावा! 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नाही. यावरुन महाविकासआघाडी सरकारमधील सर्व मुस्लिम आमदारांनी याचा निषेध करुन राजीनामे द्यायला हवेत, असे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले. ही खूपच दु:खद घटना आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मशीद पाडल्याचे समर्थन केले. त्यावेळी मुस्लिम नेत्यांना लाज वाटायला हवी होती. तर बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी एव्हाना राजीनामा द्यायला पाहिजे होता, असेही अबू आझमी म्हणाले.

हे किमान सामान कार्यक्रमात बसते का? – काँग्रेस 

या प्रकरणी जरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणे टाळले, अबू आझमी यांचे वक्तव्य वैयक्तीक आहे, त्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही, असे म्हणाले, परंतु त्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र याला विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना बाबरी मशिदीचे पतन झाले, त्या प्रसंगाचा जल्लोष साजरा केला. त्यावेळी उपस्थित काँग्रेस आणि एनसीपी या पक्षांचे मंत्री आणि आमदार त्या भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या किमान सामान कार्यक्रमाचा भाग आहे? यामुळे ओवैसी यांच्यासारख्या विषारी झाडांना खतपाणी मिळणार नाही का?, अशा शब्दांत निरुपम यांनी ट्विटरवरून सरकारवर टीका केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here