दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात असताना, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुखांना गर्दी जमवण्यासाठी टार्गेट आखून दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक शाखेतून ४ बस सोडण्यात येणार असून, यंदा मुंबईतून ५० हजारांपेक्षा अधिक गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : मलबार हिलमधील बंगला नाहीच; ‘त्या’ दोन मंत्र्यांचे प्रयत्न ठरले निष्फळ )
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी शिवसेना भवनमध्ये उद्धव गटाची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शिवाजी पार्कमधील तयारी आणि इतर विषयांवर चर्चा झाली. शिवाय गर्दी जमवण्यासाठी मायक्रो प्लानिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाकडून जवळपास १० हजारांहून अधिक बस आरक्षित करण्यात आल्याने, मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस गर्दी जमवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून ४ बस सोडल्या जाव्यात, अशी सूचना करण्यात आली.
मुंबईत शिवसेनेच्या २२७ शाखा आहेत. प्रत्येकी ४ बस सोडल्यास ९०८ गाड्या भरून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होतील. एकट्या मुंबईतून यंदा ५० हजारांपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी विभागप्रमुखांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर विभाग प्रमुखांची बैठक घेत केल्याचे कळते.
राजन विचारेंवर ‘ही’ जबाबदारी
मुंबईत शिवसेनेचे १२ विभागप्रमुख आहे. दसरा मेळाव्यासाठी प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्याशिवाय ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिकमधून मोठी गर्दी अपेक्षित आहे. खासदार राजन विचारे यांच्यावर ठाण्यासह, मीरा-भाईंदर व नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community