उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले, म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत!

101

खेडनंतर उद्धव ठाकरेंनी रविवारी मालेगावमध्ये सभा घेतली. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या होमग्राऊंडवरील या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींना चांगलेच सुनावले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आज जाहीरपणे राहुल गांधींना सांगतोय स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहेत… त्यांचा अपमान मला पटणारा नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, कारण सावरकर काय होते हे आपण फक्त वाचू शकतो परंतु तो काळ जर आता आठवला, तर तुम्हाला कळेल चाफेकर बंधुंना फाशी दिली गेली तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त १५ वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी अष्टभुजा देवीजवळ शपथ घेतली होती… ‘इंग्रजांना मारता मारता मरेन पण लढेन.’ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मातृभूमीसाठी स्वराज्याचा अभिषेक करेन, असे त्यांचे विचार होते.”

राहुल गांधींना इशारा 

पुढे ते म्हणाले, वीर सावरकरांच्या वाड्यात मी भगूरला बाळासाहेबांसोबत गेलो आहे. स्वातंत्र्यवीरांनी जे काम केले आहे ते सर्वसामान्यांचे काम नाही, १४ वर्ष रोज मरण यातना, चाबकाचे फटके, इंग्रजांनी त्यांचा छळ केला हे बलिदान सर्वोच्च आहे. म्हणून राहुल गांधींना सांगतोय सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत आता वेळ चुकली तर देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही.

‘२०२४ मध्ये पुन्हा हे लोक तिथे बसले तर त्यानंतर देशातील लोकशाही संपेल ही लढाई देशाचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. ज्या सावरकरांनी १४ वर्ष छळ सोसला तेही आज ही परिस्थिती बघत असतील. मी सुद्धा सावरकर भक्त आहे. तुम्ही कोणाचेही अंधभक्त होऊ नका असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना लगावला.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.