राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर असलेले ११ प्लॅट सिल करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. मेव्हण्याकडील बेनामी संपत्तीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र, आजवर नातेवाईकांमुळे अनेकांना मुख्यमंत्रीपदाचा तुळशीपत्र ठेवत राजीनामा द्यावा लागला होता. युती सरकारच्या काळातील शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनलेल्या मनोहर जोशी यांना जावयामुळे, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना सासुसासऱ्यांमुळे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आपल्या मुलामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे दुसरे आणि आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या त्या यादीतील चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत.
नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले हे पहिले मुख्यमंत्री नाही
सध्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जेरीस आणले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील मंत्र्यांना टार्गेट करत त्यांचे खरे चेहरे बाहेर आणण्यास सुरुवात केली. त्यामुळेच राज्याचे गृहमंत्रीपद भूषवणाऱ्या अनिल देशमुख आणि अल्पसंख्याकमंत्री नबाव मलिक यांना जेलमध्ये जावे लागले. तर शिवसेनेच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय परिवहन मंत्री अनिल परब हे विरोधी पक्षाच्या रडारवर असून त्यांच्याही अडचणीत वाढ करून ठेवली आहे. मंत्र्यांभोवतीच्या अडचणी वाढवल्या जात असतानाच आता थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही अडचणीत आणले आहे. उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर थेट ईडीने कारवाई करत त्यांचे ठाण्यातील ११ प्लॅट सील केले आहेत. त्यामुळे पाटणकर यांच्यावरील कारवाईमुळे मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. परंतु नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले हे पहिले मुख्यमंत्री नाहीत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अशोकराव चव्हाण, विलासराव देशमुख हे आपल्या नातेवाईकांमुळे अडचणीत आले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरेंचाही समावेश झाला आहे.
(हेही वाचा – ‘मातोश्री’ला चारही बाजुंनी घेरले; आता नंबर कोणाचा?)
राज्यात १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मनोहर जोशी हे मुख्यमंत्री बनले होते. परंतु पुण्यातील एका भूखंडाप्रकरणी जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यावर आरोप झाले होते. शाळेचे आरक्षण उठवून व्यास यांनी ही जमिन जावयाला दिली होती,असा आरोप झाला होता. त्यानंतर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मागून घेत या पदावर नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवले होते. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले स्वर्गीय विलासराव देशमुख हे २००८ मध्ये मुख्यमंत्री पदी असताना मुंबईत झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलचे नुकसान झाले होते.या हॉटेलची पाहणी करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे तिथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यात त्यांचा मुलगा चित्रपट अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हेही होते. त्यामुळे विलासराव देशमुख सरकारवर टिका झाली होती. या दहशतवादी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विलासराव देशमुख यांनाही आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण राजीनाम्याचे कारण मुलगा ठरला होता.
तर विलासराव देशमुख यांच्यानंतर मुख्यमंत्री पदावर चढलेले अशोक चव्हाण हेही अशाच प्रकारे अडचणीत सापडले होते. सन २००९ मध्ये मुख्यमंत्री बनलेल्या चव्हाण यांना अवघ्या वर्षभरात राजीनामा द्यावा लागला होता. याचे कारण होते आदर्श घोटाळा. सन २०१० मध्ये उघड झालेल्या या आदर्श घोटाळ्यामध्ये कुलाब्यातील लष्कराच्या आरक्षित जमिनीवर निवासी इमारत उभी राहिली होती. या इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी तीन प्लॅट चव्हाण यांनी बेनामी आपल्या नावावर केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर हे प्लॅट सासू व सासऱ्यांच्या नावावर असल्याचे उघड झाल्यानंतर चव्हाण यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
उध्दव ठाकरेंची मेव्हण्यामुळे वाढली चिंता
आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही चिंता मेव्हण्यामुळे वाढली असून जावयावर आरोप झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांचा राजीनामा मागून घेतला, तोच न्याय उध्दव ठाकरे स्वत:बाबत करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटणकर हे सध्या फरार असल्याचे बोलले जात असल्याने विरोधकही अधिक आक्रमक होत आहेत. आधीच मंत्र्यांवरील कारवाईमुळे मुख्यमंत्री चिंतेत आहेत, त्यांचे राजीनामे घेण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यातच मेव्हण्यामुळे वाढलेल्या अडचणींचा उध्दव ठाकरे कसा सामना करतात की राजीनामा देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Join Our WhatsApp Community