बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना फोन केला होता, असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. या प्रकरणी उद्धव ठाकरेंची ‘एसआयटी’ चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांकडून सविस्तर अहवाल १५ दिवसांत मागवला जाईल. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तो सादर केला जाईल. अहवाल आल्यानंतर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
उमेश कोल्हे हिंदू विचारांचे होते. हिंदू विचारांचा प्रचार-प्रसार करत होते. भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांत पोस्ट लिहिल्यानंतर त्यांना धमक्या आल्या. अमरावतीच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. उमेश कोल्हेंची चौकात हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो तपास एका काँग्रेसच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून चोरीच्या प्रकरणात बदलला, असा आरोपही रवी राणांनी केला.
उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी
- उमेश कोल्हेंना धमक्या येत असतानाही एक महिना अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांनी लक्ष दिले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांना फोन आला. हा संपूर्ण तपास चोरी झाल्याच्या दिशेने करा आणि ही केस दाबा, असे उद्धव ठाकरेंनी सांगत या तपासाची दिशा बदलली.
- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केस दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी एनआयएची चौकशी लावली. ती टीम आली. तेव्हा लक्षात आले की, नुपूर शर्माच्या पोस्टचे उमेश कोल्हेंनी समर्थन केलं म्हणून हत्या करण्यात आली. या हत्येला दाबण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले.
- त्यामुळे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, एसआयटीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. पोलीस अधीक्षकांचीही चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांना माझं सांगणे आहे की, काँग्रेसच्या सांगण्यावरून तुम्ही हिंदू विचारांच्या लोकांना दाबत असाल, तर हे सरकार हिंदू विचाराचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचा तपास करतील. उद्धव ठाकरेंनी केलेल्या फोनची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणांनी विधानसभेत केली.
( हेही वाचा: राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी थेट विधानभवनात, बंद दाराआड झाली चर्चा )
अहवाल मागवणार
राणांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, लक्षवेधी बाहेरचा हा प्रश्न आहे. मी लक्षवेधी पुरती माहिती घेतलेली आहे. तरीसुद्धा सभागृहात जे सदस्य बोलतात, ते सत्य मानून त्यावर कार्यवाही करायची असते. ज्या गोष्टीचा उल्लेख राणा यांनी केला, त्या अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल. त्यांचा आक्षेप तिथल्या पोलीस आयुक्तांवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांकडून सविस्तर अहवाल १५ दिवसांत मागवला जाईल. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तो सादर केला जाईल. अहवाल आल्यानंतर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
Join Our WhatsApp Community