उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राईम ब्रांच युनिट अकराने अटक केली आहे. खंडणी आणि सावकारी कायद्यानुसार, भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याच प्रकरणात त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. योगेश भोईर हे ठाकरे गटाचे कांदिवलीतील उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवकही आहेत.
विकासकांकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर समता नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना जामीनही मंजूर झाला होता. परंतु एका जुन्या गुन्ह्यातले प्रकरण क्राईम ब्रांच युनिट अकराकडे दाखल झाले. या प्रकरणात त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.
( हेही वाचा: काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्याकडून राहुल गांधींची श्रीरामाशी तुलना! )
भोईर यांना किल्ला न्यायालयात हजर करणार
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राईम ब्रांच युनिट अकराने मंगळवारी रात्री अटक केली. भोईर यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाई विरोधात रात्री शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी क्राईम ब्रांच युनिट बाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भोईर यांना क्राईम ब्रांच कार्यालयात हलवण्यात आले. बुधवारी त्यांना 11 वाजता किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community