आमदार, खासदार आणि नगरसेवक सोडून गेल्यामुळे आता दुसऱ्याच्या घरात डोकावणे, दुसऱ्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे, दुसऱ्याच्या कार्यक्रमावर चर्चा करणे, इतकाच कार्यक्रम उद्धव ठाकरेंकडे उरला आहे. ‘आधे इधर, आधे उधर, हम तो कडक जेलर’ अशी शोले सिनेमामधल्या ‘असरानी’ सारखी त्यांची अवस्था झाल्याची टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.
शेलार म्हणाले, पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, एक शुभेच्छा, अभिनंदन देखील केलं नाही? पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर उद्धवजींची प्रतिक्रिया आली. मग उद्धवजी, तुमच्या प्रतिक्रियांची स्क्रिप्ट अन्य कुठे मंजूर होते का? त्यानंतर आपण बोलता का? असा आज जनतेच्या मनातला प्रश्न आहे…आणि मग चंद्रावरच्या घराची गोष्ट करायची असेल तर, तुमच्यावर असाही मुंबईकरांचा, देशवासियांचा विश्वास नाही, त्यामुळे उद्धवजींनी उपहासात्मक केलेले विधान हे सहजतेने घेऊ नका, असे आम्ही नम्रपणे सांगतो.
मला तर आता अशी शंका आहे की, भ्रष्टाचाराची पुंजी इतकी वाढल्यानंतर मातोश्री एक झालं, मातोश्री दोन झालं, आता उरलेल्या पैश्यात चंद्रावर मातोश्री तीनचा विचार तर उद्धवजींच्या मनात नाही ना? त्याकरिता उद्धवजी तुम्ही उपाहासाने बोलताय का? हा जनतेच्या मनात प्रश्न आहे, असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला.
बोलताना मर्यादा ठेवा!
– उद्धव ठाकरे यांच्या सभा म्हणजे सार्वजनिक रडण्याचा, रुदालीचा कार्यक्रम असतो. केवळ दुसऱ्याच्या घरात डोकावणे, दुसऱ्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे, दुसऱ्याच्या कार्यक्रमावर चर्चा करणे, एवढाच कार्यक्रम सुरु आहे. स्वतःचा कार्यक्रम, धोरण नसलेल्या पक्षाचे नाव म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष होय.
– पातळी सोडून बोलण्याची भाजपची पद्धती नाही. त्यामुळे नम्रपणे आमचे सांगणे आहे की, मर्यादा ठेवा. मर्यादेत रहा, भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिकता हा दुबळेपणा नव्हे.
– तुमची आज अशी स्थिती झाली आहे की, ज्या वेळेला तुम्ही बाहेर निघतात त्यावेळेला तुमचा पक्ष कुठला? मागचे नगरसेवक निघून गेले, मागे पक्षात आमदार बघितले तर ते पळून गेले, मागचे खासदार सोडून गेले आणि म्हणून आम्हाला म्हणायचं ते आम्ही म्हणणार नाही, पण तुमची अवस्था शोलेमधल्या “असरानी” सारखी झालेली आहे.
– आम्हालाही तुम्हाला घरबशा म्हणायचं नाही, घर कोंबडा म्हणायचं नाही, तात्या विंचू म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही.. आणि म्हणणारही नाही… अहंकारामुळे तुमच्या पक्षातील तुमचे स्थान काय याचं जनतेत मूल्यमापन काय झालं आहे याचा विचारही तुम्ही करायला पाहिजे, असेही शेलार म्हणाले.
इंडिया म्हणजे परिवार वाचवण्यासाठी धडपड
इंडियाची बैठक म्हणजे पारिवारिक कार्यक्रमाला जास्त प्राधान्य, देशहिताला नाही. जे होणारच नाही पण कल्पनाच जर करायची असेल आणि रंगवायचं जर असेल, तर हे कधी चुकून सत्तेत आले तर पक्ष, लोकसभा, राज्यसभा घेऊन जातील आणि परिवाराबरोबर पर्यटन करत बसतील. विदेशात जातील, त्यामुळे ही उडणारी फुलपाखरं आहेत. या फुलपाखरांच्या जीवावर देशहित साध्य होणार नाही, हे देश आणि जनता चांगलेच जाणते. ही सगळी धडपड देशासाठी नसून आपले परिवारवादी पक्ष वाचवण्यासाठी आहे, अशी टीका शेलार यांनी केली
नितिन देसाई प्रकरणात दोषींना वाचवायला मदत करताय का?
नितीन देसाई यांच्या मृत्यूचे राजकारण करता कामा नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूला, आत्महत्येला जे जबाबदार आहेत, जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण माझा सवाल आहे की, संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला गेलात का? त्यांचे अंतदर्शन घेतलेत का? का शोकभावना प्रगट केल्या नाहीत? त्यांच्या परिवाराला भेटलात का? का नाही भेटलात? राजकारण करायची आमची इच्छा नाही, पण आज तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून विचारावे लागते की, कोणी तुम्हाला नितीन देसाई यांच्या परिवाराला भेटण्यापासून
थांबवलं? यासंबंधीचा प्रश्न मी, महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला. देवेंद्रजींनी कारवाईचे आदेश दिले. एफआयआर दाखल झाला, जे दोषी आहेत ते स्वतःची अटक वाचविण्यासाठी धावत आहेत. पण त्यावेळी विधानसभेमध्ये उद्धवजी तुमच्या पक्षाचा एकही आमदार का बोलला नाही? म्हणजे हे सगळं तुम्ही जे दोषी आहेत रशेष शहा आणि त्यांच्या माणसांना मदत करण्यासाठी करताय का? हा आमचा आरोप आहे, असेही शेलार म्हणाले.
Join Our WhatsApp Community