सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे, असे विखारी उद्गार तमिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Defames Sanatan Dharma) यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. उदयनिधी स्टॅलिन हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचा मुलगा आहेत.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपकडून उदयनीधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत उदयनिधी स्टॅलिन यांना लक्ष्य केले आहे. “मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. सनातन धर्माला फक्त विरोध न करता तो संपवला पाहिजे, असं स्टॅलिन यांचे मत आहे. थोडक्यात सनातन धर्म मानणाऱ्या देशातील ८० टक्के लोकसंख्येला संपवण्याची ते भाषा करत आहेत. द्रमुक हा विरोधी पक्षातील प्रमुख पक्ष असून काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर मुंबईतील बैठकीत एकमत झाले होते का?” असा प्रश्न अमित मालवीय यांनी विचारला आहे.
भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांनी याविषयी काँग्रेसला प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, “एम.के. स्टॅलिन हे I.N.D.I.A. आघाडीचे भक्कम आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा मुलगा सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करत आहेत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याविषयी बोलत आहेत. काँग्रेस पक्ष आणि भारत आघाडीच्या इतर सदस्यांनी त्यांचे मत मांडले पाहिजे. ते एकत्र येऊन युती करत आहेत की, सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अशी विधाने करत आहेत.”
यावर प्रत्युत्तर देत उदयनिधी स्टॅलिन यांनी विधानावर ठाम असल्याचे सांगितले आहे. ‘सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे’, असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांचे वडील आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनीही माझा सनातन धर्मावर विश्वास नाही, असे उद्गार काढले होते. (Udhayanidhi Defames Sanatan Dharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community