राज्यात कोरोनाचे संकट आहे आणि या संकटामध्ये विद्यार्थ्यांना कमी त्रास देऊन घरातल्या घरात परीक्षा देता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सहा जणांची समिती
अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले. तसेच दोन संचालक सुद्धा या समितीत आहेत. या समितीची आज बैठक पार पडली.
काय म्हणाले उदय सामंत
विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम असून, सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंचे देखील यावर एकमत झाले आहे. बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली आहे. यासंदर्भात २ सप्टेंबरला आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक लावून मुदतवाढीसाठी यूजीसीकडे विनंती करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये परीक्षा होणार?
संपूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येईल तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षासंदसर्भात निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे सामंत यांनी सांगितले. काही कुलगुरुंनी सूचनांसाठी आणखी एक दिवस मागितल्याचे सांगत परीक्षा आणि निकालाची तारीख, एटीकेटीचे काय यासंदर्भात देखील निर्णय घेऊ असे ते म्हणालेत.
काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले असून, यूजीसीच्या ६ जुलैच्या गाईडलाईन्सनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितले होते. तसेच ३० सप्टेबरपर्यंत परीक्षा घेऊ न शकणाऱ्या राज्यांनी परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यासाठी यूजीसीशी संपर्क करावा, असे देखील कोर्टाने म्हटले आहे. एखाद्या राज्याला जर परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी यूजीसीशी चर्चा करावी असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आज न्या. अशोक भूषण, न्या. सुभाष रेड्डी, न्या. एम.आर.शाह यांनी हा फैसला सुनावला आहे.
Join Our WhatsApp Community