गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता युक्रेनने मॉस्कोवर भीषण हल्ला केला आहे. युक्रेनी सैन्याचे ड्रोनने मॉस्कोतील २ इमारतींना टार्गेट केले. या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या हल्ल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले पण कुणीही जखमी नाही अशी माहिती मॉस्कोचे मेयर यांनी दिली.
युक्रेनच्या या हल्ल्यानंतर रशियाने मॉस्कोच्या वनुकोवो एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. युक्रेन सीमेपासून ५०० किमी अंतरावरील मॉस्को आणि आसपासच्या शहरांना ड्रोनने निशाणा बनवण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून ड्रोन हल्ल्याची मालिका शहरातील दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या एका विमानतळावरील हल्ल्यापासून सुरू झाली होती. रशियाने सांगितले होते की, त्या रात्री युक्रेनचे ५ ड्रोन पाडले होते. ड्रोन हल्ले अमेरिका आणि नाटोतील सहकारी देशांच्या मदतीशिवाय शक्य नाहीत असा आरोप रशियाने केला आहे.
शुक्रवारी रशियाने म्हटलं की, यूक्रेन सीमेजवळील दक्षिणी रोस्तोव क्षेत्रात २ युक्रेनी मिसाईल रोखल्या. ज्यात तगानरोग शहरात ढिगारा कोसळल्याने १६ लोक जखमी झाले. मागील वर्षी फेब्रुवारीत मॉस्कोकडून केलेल्या सैन्य कारवाईला उत्तर म्हणून युक्रेन सीमेलगत परिसरात वारंवार ड्रोन हल्ले आणि गोळीबारी होत असल्याचे दिसून येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत शांततेसाठी चर्चा होऊ शकते परंतु युक्रेन हल्ल्यामुळे तणाव आणखी वाढतोय असं म्हटलं.
(हेही वाचा Accident : पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; २ पोलिसांचा जागीच मृत्यू)
Join Our WhatsApp Community