वांद्रे पूर्व येथील शिवसेना उबाठा गट प्रणित अनधिकृत रिक्षा युनियनचे कार्यालय तोडण्यात आल्यानंतर आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे सहायक अभियंता अजय पाटील यांना मारहाण केल्यानंतर आता शिवसेनेच्या शाखा आणि इतर संलग्न कार्यालये महापालिकेच्या रडावर असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेची शाखा नसतानाही युनियनचे कार्यालय अनधिकृत असल्याने तोडल्यानंतरही शिवसेना उबाठा गटाने कांगावा करत केलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शिवसेना शाखांच्या जुन्या तक्रारींवर लक्ष वेधण्याचा निर्धार महापालिकेने केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार असताना ज्याप्रकारे जुन्या तक्रारींच्या आधारे अनेकांच्या घरांवर कारवाई करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर आता जुन्या तक्रारी पटलावर आणून शिवसेनेच्या अनधिकृत शाखा तसेच त्यातील नियमबाह्य केलेले बांधकाम यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वांद्र पूर्व येथील शिवसेना प्रणित रिक्षा युनियनच्या कार्यालयामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या युनियनच्या कार्यालयावर कारवाई केली. ही कारवाई करताना शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व फोटो काढून घेण्यासाठी परवानगी मागितली, त्याप्रमाणे महापालिकेने त्यांना तसा अवधीही दिला आणि त्यानंतर कारवाई केली. परंतु या युनियनच्या कार्यालयाला शाखा संबोधून शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली.
(हेही वाचा – Man Ki Baat Comics : ‘मन की बात’ आता कॉमिक्सच्या रूपात; पंतप्रधानांच्या प्रेरक कथा मुलांपर्यंत पोहोचणार)
या मारहाणीचे तीव्र पडसाद आता महापालिकेच्या अधिकारी आणि अभियंत्यांमध्ये उमटू लागले असून जर शाखा नसतानाही शिवसेना उबाठा गट जर याचे भांडवल करत असेल तर त्यांच्या अनधिकृत शाखांवर आता लक्ष वेधायला हवे,असा काहीसा निर्धार महापालिकेने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये शिवसेना उबाठा गटाच्या २२७ प्रभागांमध्ये २५० हून अधिक शाखा असून त्यातील ८० ते ९० टक्के शाखा या अनधिकृत आहेत. मात्र, मागील २५ वर्षांमध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने या अनधिकृत शाखांना संरक्षण दिले गेले. परंतु २५ वर्षांत केवळ सत्ता असल्याने महापालिकेचे अधिकारी त्यावर हात लावू शकले नाही, पण आता सत्ता गेल्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. परंतु शाखा नसतानाही त्याचे भांडवल करत अभियंत्यांना केलेली मारहाण ही सर्वच अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे.
ठाकरे सरकारच्या काळात ज्याप्रकार याच अधिकाऱ्यांना सांगून जुन्या तक्रारी शोधून काढून केंद्रीय मंत्री नारायण राणे, नवनित राणा, कंगना राणौत, रेडीओ जॉकी मलिष्का आदींसह इतरांच्या घरांवर कारवाईसाठी नोटीस बजावत कारवाई केली होती, त्याच पध्दतीचा वापर आता ठाकरेंच्या शिवसेना शाखांना नोटीस देत त्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शाखा नव्याने उभारल्या आहेत त्यावर कारवाई केली जाईल आणि ज्या शाखांमध्ये नुतनीकरणातंर्गत बांधकाम केले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community