पनामा, पॅराडाईज पेपर लीक : भारतातील अघोषित संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!

118

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्याशी संबंधित भारताशी संलग्न 930 संस्थांची 1 अॉक्टोबर 2021 पर्यंत, अघोषित संपत्ती एकूण 20,353 कोटी रुपयांची आढळून आली आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

प्राप्तिकर कायदा, 1961 आणि काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 यांसारख्या प्राप्तिकर विभागाद्वारे अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विविध कायद्यांच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत प्राप्तिकर विभाग योग्य ती कारवाई करतो, असे मंत्री म्हणाले. प्रत्यक्ष कर कायद्यांतर्गत अशा कारवायांमध्ये जिथे लागू असेल, तिथे तपास आणि जप्ती, सर्वेक्षण, चौकशी, उत्पन्नाचे मूल्यांकन आणि पुनर्मुल्यांकन, व्याजासह कर आकारणी, दंड आकारणे, फौजदारी न्यायालयात खटल्याच्या तक्रारी दाखल करणे इत्यादींचा समावेश आहे.

(हेही वाचा ठाकरे सरकारच म्हणाले, ‘अनिल परबांचे रिसॉर्ट बेकायदेशीर!’ )

130 प्रकरणांमध्ये काळा पैसा

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीकच्या 52 प्रकरणांमध्ये, काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत फौजदारी खटल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, 130 प्रकरणांमध्ये काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्यामधील आतापर्यंत करांची 153.88 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे, असे यासंदर्भात अधिक तपशील देताना मंत्र्यांनी सांगितले.

पेंडोरा पेपर्स लीकचाही तपास सुरू

पेंडोरा पेपर्स लीकशी कथित संबंध असलेली काही भारतीय नावे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. भारत सरकारने याची दखल घेतली असून समन्वित आणि जलद तपासाच्या उद्देशाने पेंडोरा पेपर्स लीकचा तपास बहु संस्था समूहाच्या (एमएजी) छत्राखाली आणला आहे, याची स्थापना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांच्या संयोजकत्वाखाली करण्यात आली आहे, ज्यामध्ये सक्त वसुली संचालनालय (ईडी ), भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय ), भारताचा आर्थिक गुप्तचर विभाग (एफ आय यू -आयएनडी ) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे परदेशी कर आणि कर संशोधन विभाग या सदस्य संस्था आहेत, अशी माहिती चौधरी यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.