महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव हा पक्षासाठी धक्कादायक ठरला असून, या पराभवाचे खापर थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर फुटत आहे. लोकसभेतील चांगल्या प्रदर्शनामुळे हवेत गेलेल्या काँग्रेसला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे लागले, आणि याचाच फटका पक्षातील नेतृत्वाला बसल्याचे स्पष्ट होत आहे.
पक्षांतर्गत कुरघोड्या उघड्या!
विधानसभेच्या अपयशानंतर काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला अधिक धार आली आहे. पक्षातील असंतोष वाढला असून, नेतृत्व बदलाच्या चर्चा अधिक जोर धरत आहेत. अलीकडेच काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाचा राजीनामा देताना थेट पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर ४ कोटी रुपयांची उमेदवारीसाठी मागणी केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी जरी नाव घेतले नसले, तरी प्रदेश काँग्रेसमध्ये दोन “नाना” असल्याचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे पटोले यांच्यावरच बोट ठेवले जात आहे.
(हेही वाचा – मुंबई बँक सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करते; विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचे प्रतिपादन)
या आरोपानंतर पक्षश्रेष्ठी सतर्क झाले आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) नांदेड व नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी त्वरित त्या नियुक्त्या रद्द केल्या. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मंजुरी न घेता घेतलेल्या निर्णयामुळे चेन्निथला यांनी थेट पटोलेंना दणका दिला. यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला आणखी हवा मिळाली.
विजयानंतरचा अहंकार भारी पडला?
लोकसभेतील चांगल्या प्रदर्शनानंतर प्रदेश काँग्रेसने विधानसभेसाठीही मोठे दावे केले होते. मात्र, संघटनात्मक नियोजनाचा अभाव आणि अतिआत्मविश्वास यामुळे पक्षाचा धुव्वा उडाला. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून, त्याचा सर्वात मोठा फटका नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यातही बसल्याचे दिसते. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडत असून, पटोलेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
(हेही वाचा – Gadchiroli मध्ये शिक्षिकेसह ४ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण)
पक्षश्रेष्ठींचा पटोलेंवरचा विश्वास डळमळीत?
विधानसभा पराभवानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोलेंच्या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे. पराभवाचे कारण म्हणून स्थानिक पातळीवरील कमकुवत नेतृत्व आणि चुकीच्या रणनीतीचा उल्लेख वारंवार केला जात आहे. परिणामी, पक्षश्रेष्ठी आता पर्यायी नेतृत्वाचा विचार करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आगामी काळात पटोले बाजूला?
सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढत चालली आहे. पक्षाची गळती थांबवण्यासाठी आणि संघटना पुन्हा बळकट करण्यासाठी पक्षश्रेष्ठी नव्या नेतृत्वाचा विचार करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले, तर नाना पटोलेंना बाजूला सारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणजेच, काँग्रेससाठी हे फक्त निवडणूक पराभवाचे संकट नसून, पक्षाच्या नेतृत्वासाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पटोलेंचा राजकीय भवितव्य काय असेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community