नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार आणि खासदार फुटल्यानंतर शिवसेनेत आता खळबळ माजली आहे. या पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व शाखा शाखांमधून संदेश देत शिवसैनिकांच्या बैठका आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शाखांमध्ये शिवसैनिकांच्या बैठका घेऊन त्यांच्या भावना समजून घेत पक्षाची भूमिका पटवून देत त्यांना मानसिक धीर देण्याच्या सूचना केल्या जात आहेत. जेणेकरून शिवसैनिक बिथरून न जात पक्षाशी बांधील राहील अशा प्रकारचा विचार पक्षाचा आहे.
शाखा-शाखांमधून गटप्रमुखांसह कार्यकर्त्यांच्या बैठका
पक्ष फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय वर्षा निवासस्थान सोडून आपल्या मूळ मातोश्री निवासस्थानी राहायला गेले. बुधवारी वर्षा निवासस्थानावरून मातोश्री निवासस्थानाच्या दिशेने निघताना रस्त्यात शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगत जोरदार पाठिंबा दर्शवला. प्रत्येक शिवसैनिक पक्षासोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत असतानाच त्यांनी बुधवारी सर्व विभाग प्रमुख आणि महिला विभाग संघटक यांना निरोप पाठवून शाखा शाखांमधून गटप्रमुख आणि कार्यकर्ते यांची बैठक घेऊन धीर देण्याच्या सूचना केल्या आहेत. या बैठकांमधून शाखा शाखांची चाचपाणीला ठाकरे यांनी सुरुवात केली.
पक्ष फुटीनंतर पक्षात स्थिरता आणण्याचे प्रयत्न
आमदार, खासदार आणि नगरसेवकही त्यांचासोबत जात असल्याने आपले कोण आणि त्यांचे कोण हे तपासून पाहण्यासाठी या बैठका आयोजित केल्याचे बोलले जात आहे. पक्ष फुटीनंतर पक्षात स्थिरता आणण्यासाठी या बैठकांचे आयोजन केले जात असल्याचेही बोलले जात आहे. शाखाप्रमुख, महिला शाखा संघटक, युवासेना शाखा अधिकारी यांच्या माध्यमातून गटप्रमुख आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करत विभागातील संघटना बांधणी कुठेही कमजोर होणार नाही यांची काळजी घेत शिवसैनिकांना, शिवसेना अभेद्य आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे. मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना तातडीने सर्व शाखांमध्ये अशा प्रकारचे बैठक घेण्याचे निर्देश दिल्याने सर्व शाखा प्रमुख संघटक आणि युवा सेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले जात आहे.
(हेही वाचा – “आमच्या विठ्ठलाला…”, राज ठाकरेंप्रमाणेच शिंदे गटाचाही ‘बडव्यां’वर रोष)
दरम्यान, दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील दादर- माहिम, धारावी, वडाळा भागाचे विभाग प्रमुख आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटात सामील झाले आहे आहेत, तर शीव, चेंबूर आणि अणुशक्ती नगर विधान सभा क्षेत्राचे विभाग प्रमुख मंगेश सातमकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आमदार कुडाळकर हेही शिंदे गटात गेल्याने कुर्ला भागातील शिवसैनिक अस्थिर होण्याची शक्यता लक्षात घेता या बैठकांमधून कोणता पदाधिकारी आणि कार्यकर्ता नॉट रीचेबल आहे, हे तपासण्यासाठी या बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत.
Join Our WhatsApp Community