२०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार केला जाणार आहे. पुढील आठवड्याच्या आत हा विस्तार उरकला जाईल, असे कळते.
२०२३ आणि २०२४ मध्ये जवळपास नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांना मंत्रिमंडळ विस्तारत प्राधान्यक्रम दिला जाईल. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा त्यात समावेश आहे. संभाव्य विस्तारात महाराष्ट्रातून शिंदे गटाच्या दोन नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काही नावे मागवण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. त्या व्यतिरिक्त भावना गवळी याही इच्छुक आहेत. त्यामुळे यातील नेमकी कुणाची नावे अंतिम होतात हे पहावे लागेल.
भाजपातून फेरबदल होणार?
मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील भाजपाच्या मंत्र्यांपैकी एकाचे पद जाईल, असे बोलले जात आहे. या नेत्याला राज्यपाल पद देऊन बोळवण केली जाणार आहे. तसे संकेत संबंधिताला आधीच देण्यात आल्याचे कळते.