केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १७ फेब्रुवारीपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते नागपूर, पुणे आणि कोल्हापूर शहरांना भेट देणार आहेत.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी रात्रीच्या विमानाने नागपूरला येतील. शुक्रवारी रात्री हॉटेल रॅडिसन-ब्ल्यू येथे त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर शनिवारी ते नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. यासोबतच एका खासगी कार्यक्रमात सहभागी होतील. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुण्याला प्रयाण करतील.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा घेणार बैठक
पुण्यातील कसबापेठ आणि पिंपरी-चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहा बैठक घेणार आहेत. त्यानंतर रविवारी १९ फेब्रुवारी रोजी त्यांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित आहे. कोल्हापूर येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तसेच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शहा सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पहिल्यांदाच अमित शहा नागपूर संघ कार्यालयात भेट देणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अमित शहा मार्च २०१८ मध्ये रेशीमबाग संघ कार्यालयात गेले होते. परंतु, केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर नागपुरातील संघ कार्यालयात ते पहिल्यांदाच भेट देणार आहेत. आगामी १२ ते १४ मार्च दरम्यान हरियाणातील सोनीपत येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपतर्फे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा किंवा बी.एल. संतोष सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु, तत्पूर्वी काही महत्त्वाच्या मुद्यावर अमित शहा संघ श्रेष्ठींशी चर्चा करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान आगामी १८ फेब्रुवारी रोजी अमित शहा सरसंघचालकांना भेटणार का? याबाबत संघ आणि भाजपकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
(हेही वाचा – शरद पवारांचे निकटवर्ती अनिरुद्ध देशपांडेंच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी)
Join Our WhatsApp Community