गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठींना पूर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून राज्यातील जवळपास सर्वच बड्या भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप मनसेसोबत सूत जमवणार का, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील राज ठाकरे यांची भेच घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः ‘एक’ साहेब आणि ‘एक’नाथ साहेब…विचारांचा वारसा ‘क्लिक’ झालाय, मनसेचे सूचक ट्वीट)
मनसे-भाजप युतीबाबत चर्चा?
अमित शहा हे 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौरा करणार असून यावेळी ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या बाप्पाचे शहा दर्शन घेणार आहेत. याच वेळी अमित शहा हे राज ठाकरे यांचीही भेट घेणार असून मनसे-भाजप युतीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः फडणवीस आणि अशोक चव्हाणांमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा, काँग्रेसमध्येही होणार बंडाळी?)
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकत्र येणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार या भाजप नेत्यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तसेच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुक्रवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून उठाव केला, राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे, तर हिंदुत्व हा भाजपचा जूना अजेंडा आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या या समान धाग्यातून गे तिन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचाः काँग्रेसमध्येही होणार फाटाफूट? नाराज नेते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता)
अमित शहा मुंबई दौ-यात मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपची रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी राजकीय बैठक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Join Our WhatsApp Community