स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात येऊन नवी ऊर्जा मिळते – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

98

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे एक असे स्थान आहे, जिथे आल्यानंतर नवी ऊर्जा मिळते. आजचा दिवस माझ्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ आहे, कारण दिवसाची सुरुवात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन झाली. तीही रक्तदानाच्या स्वरुपात. आणि दिवसाचा शेवट देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर सावरकरांच्या चरणी नतमस्तक होऊन झाला. त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो, असे उद्गार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काढले.

शनिवारी मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. या वेळी आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, वीर सावरकरांनी जे जीवन जगले, ते अतिशय संघर्षमय आणि आव्हानात्मक होते. आयुष्यातला एक-एक क्षण ते देशासाठी जगले. अलिकडे त्यांच्या नावावर एक पुस्तक आले. काही लोकांनी त्याच्यावर टीका सुरू केली, प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण सावरकरांनी जेथे शिक्षा भोगली त्या तुरुंगात त्यांना चार तास जरी ठेवले, तरी त्यांना त्यांच्या बलिदानाची प्रचिती येईल, असे प्रत्युत्तर ठाकूर यांनी दिले.

वीर सावरकरांचा देशाला गर्व

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी जे योगदान दिले, ते भारतीय नागरिक विसरू शकत नाहीत. मी देशातल्या युवकांना आवाहन करतो, ती तुम्ही वीर सावरकरांविषयी अभ्यास करा, त्यांच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासारखी बलिदान देण्याची वेळ आता नसली, तरी देशासाठी योगदान देण्याची आहे. संपूर्ण देशाला वीर सावरकरांचा गर्व आहे. त्यांचे विचार, त्याग आणि बलिदानापासून सच्चा भारतीय नवी प्रेरणा घेतो. सावरकर स्मारकात येऊन जी ऊर्जा मिळते, ती खूप कमी ठिकाणी मिळते. त्यामुळे मी इथे वारंवार येत राहीन, असेही ठाकूर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.