राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाची घोषणा केल्यानंतर शुक्रवारपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. खासदार संजय राऊत आणि शिवसैनिकांनी यावरुन राणा दाम्पत्यावर टीका केल्यानंतर त्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे गदाधारी आहे असं संजय राऊत म्हणाले म्हणजे आता त्यांच्या हातातली तलवार गेली, आता गदा आली, उद्या हातात झाडू येईल, अशी टीका राणे यांनी केली आहे.
संजय राऊत हिंदुत्वाबाबत बोलताना गदाधारी हिंदुत्व म्हणाले. म्हणजे यांनी आता तलवार सोडली आणि हातात गदा घेतली. उद्या यांच्या हातात झाडू येईल. आधी उद्धव ठाकरेंना विचारा त्यांना वाघ आवडतो का बकरी आवडते, ते विचारा आणि मग बोला. आजवर महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला नाही. राज्यातील प्रश्न त्यांना सोडवता येत नाहीत, अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
(हेही वाचाः राणा दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार, काय आहेत आरोप?)
हा गुन्हा नाही का?
शिवसेना नेत्यांची भाषणं किंवा पत्रकार परिषद ऐकल्यानंतर संजय राऊत, अनिल परब यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे याचं भान आहे की नाही, हा प्रश्न आहे. सत्ता असतानाही ते आव्हान देत आहेत. संजय राऊत तर स्मशानात व्यवस्था करुन ठेवा, अशी भाषा करत आहेत. जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना जाऊ देणार नाही, असं विधान अनिल परब यांनी केलं आहे. हे सगळं ऐकत असताना राज्यात पोलिस यंत्रणा आहे की नाही, हा प्रश्न आहे. अशाप्रकारे विधानं करणं हा गुन्हा नाही का, अशा वेळी पोलिस काय करत आहेत, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
मातोश्रीला शिवसैनिक जमवावे का लागतात?
अमरावतीतून राणा दाम्पत्याला मुंबईत येऊ देणार नाही, असं शिवसेनेचे नेते म्हणत होते. पण हे दाम्पत्य मुंबईत काय तर मातोश्रीच्या जवळ येऊन पोहोचले. तेव्हा शिवसेना झोपली होती का? हजारो शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत होते पण मातोश्रीच्या बाहेर 235 तर राणांच्या घराबाहेर 125 शिवसैनिक आहेत. आणि पोलिस संरक्षण असताना मातोश्रीला शिवसैनिक जमवावे का लागतात, असा सवाल राणे यांनी केला आहे.
(हेही वाचाः राणा दाम्पत्यावर ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल, काय होणार कारवाई?)
Join Our WhatsApp Community