उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा, नारायण राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव नेस्को मैदानात घेतलेल्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. त्याला आता भाजप नेत्यांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपचा उल्लेख गिधाडे असा केल्यामुळे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

उपकारांची जाणीव नाही

उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे. युतीत असताना कालपर्यंत अमित शहांना फोन करत होते. ज्या अमित शहांनी देशातून 370 कलम हटवलं त्यांच्याबाबत असं बोलताना उद्धव ठाकरेंना काहीच कसं वाटत नाही. केलेल्या उपकारांची जाणीव नसणारा प्राणी हा लांडगा असतो, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

शहांचा मुंबई दौरा ठाकरेंना का झोंबला?

उद्धव ठाकरे आता गट प्रमुखांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. ते आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे नंतर खासदार-आमदारांची बैठक घ्यायचे आणि आता गट प्रमुखांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. गट प्रमुखांसमोर केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत ते जे काही बोलले ते म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या नैराश्यातून केलेले भाषण आहे. उद्धव ठाकरेंना अमित शहांचा मुंबई दौरा का झोंबला?, ते देशाचे गृहमंत्री आहेत ते देशात कुठेही जाऊ शकतात. अमित शहा म्हणाले जमीन दाखवा म्हणजेच ठाकरे गटाने जमिनीवर यावे असे त्यांचे म्हणणे होते.

पक्षवाढीसाठी संघर्ष केला का?

उद्धव ठाकरे यांनी भाजपला असमान दाखवायची भाषा केली. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा उद्धव ठाकरे फक्त सहा वर्षांचे होते. त्यामुळे तेव्हापासून शिवसेना जी संघर्ष करत होती त्यात उद्धव ठाकरे कुठेही नव्हते. वयाच्या 39व्या वर्षी 1999 साली ते शिवसेनेत सक्रीय झाले. आपल्या 62 वर्षांच्या आयुष्यात उद्धव ठाकरेंनी पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का?, असा सवालही नारायण राणे यांनी केला आहे.

तुम्ही आयत्या बिळावरचे नागोबा

त्यांनी शिवसैनिकांना सत्तेचे दूध पाजल्याचा उल्लेख केला. शिवसेना घडायला, वाढायला, सत्तेवर जायला शिवसैनिकाने त्याग केला आहे. यामध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरे कुठेही नसून ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. सत्तेचं दूध पाजलं म्हणता पण तुम्ही मातोश्रीवर बसून तूप खाल्लं. यशवंत जाधवांपासून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबद्दल सांगितले आहे.

तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं?

हिंदुत्वाच्या नावावर उद्धव ठाकरेंनी घर चालवलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेना चालवली. पण अडीच वर्षांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय केलं?, अडीच वर्ष सत्तेत असताना तुम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केलं? ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विरोध केला त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसले, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here