याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचा पायगुण! राणेंची बोचरी टीका

मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. त्यांचे पाय पांढरे आहेत का, ते तपासायला हवं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही महाराष्ट्राला नवा नाही. आता तर कोकणात आलेल्या महापुराच्या संकटामुळे पुन्हा एकदा राणेंनी शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. राज्यात जी संकटे येत आहेत, त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगुणच जबाबदार असल्याची टीका, नारायण राणे यांनी आपल्या नेहमीच्या राणे स्टाईलमध्ये केली आहे.

मुख्यमंत्री आले आणि…

नारायण राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत रविवारी नुकसानग्रस्त भागांची पहाणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. राज्यात संकट येत आहेत, त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळे चालूच आहे. कोरोना ही त्यांची देण आहे, मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. त्यांचे पाय पांढरे आहेत का, ते तपासायला हवं, अशी टीका राणेंनी यावेळी केली.

(हेही वाचाः मुख्यमंत्री आले अन् आश्वासन देऊन गेले!)

अधिकाऱ्यांनाही भरला दम

चिपळूण दौऱ्यावर आलेले नारायण राणे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर चांगलेच चिडले. मी आणि दोन्ही विरोधी पक्षनेते चिपळूणमध्ये आलो आहोत, पण प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम माहीत नाहीत, प्रोटोकॉल माहीत नाहीत. आम्हाला भेटायला एकही अधिकारी आला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि इतर अधिकारी कार्यालयात बसून होते. पण विरोधी पक्षनेते आलेत, केंद्रीय मंत्री आहेत, तरीही हे अधिकारी आले नाहीत. हा बेजबाबदारपणा आहे. याबाबत मी राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्राकडे तक्रार करणार आहे. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिका-यांची खरडपट्टी काढली आहे. अशा अधिकाऱ्यांना चिपळूणमध्ये ठेवू नका. जर ठेवलंच तर मी तरी त्यांना खूर्चीवर बसू देणार नाही, असा सज्जड दमच राणेंनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

(हेही वाचाः तळीये दुर्घटनाग्रस्तांना पक्की घरे बांधून देणार! नारायण राणेंची मोठी घोषणा)

बघू तुमच्या खुर्च्या राहतात का?

लोक रडत आहेत, घरातील सामान फेकून देत आहेत. अन् अधिकारी दात काढत आहेत. मुख्यमंत्र्यांना सोडवायला गेले. ते काय पाहुणे आहेत काय? नुकसानग्रस्त भागांची पहाणी करणे, हे त्यांचे काम आहे. पुढच्या वेळी मी न सांगता येईन, मग बघू तुमच्या खुर्च्या राहतात का?, असा इशारा देखील राणेंनी यावेळी अधिका-यांना दिला.

(हेही वाचाः सामंतांना मारा गोळी!)

म्हणून मातोश्रीचा दरवाजा उघडला

मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यावर देखील राणेंनी जोरदार टीका केली असून, मुख्यमंत्री कोकणात का आले याचे कारण देखील राणेंनी यावेळी सांगितले. शनिवारी साडे सहाला माझा फॅक्स आला, मी कोकणात येत असल्याचे कळवले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थिती पाहण्याचा कार्यक्रम तयार केला. तेव्हा मातोश्रीचा दरवाजा उघडला, नाहीतर बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात, तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज मिळाल्यावर, ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? ही परिस्थिती झाल्या झाल्या त्यांनी यायला हवे होते. उभे राहून सर्व यंत्रणा कामाला लावायला हवी होती, पाठांतर करुन यायाचे आणि बोलायचे, हे कसले मुख्यमंत्री? या राज्यात मुख्यमंत्री आणि प्रशासन गैरहजर असल्याची राणेंनी टीका केली.

(हेही वाचाः काहीही करा, पण मदत करा… मुख्यमंत्र्यांसमोर महिलेने फोडला टाहो)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here