केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरी विशेष कारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी या कारागृहात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर कोठडीला भेट देत सावरकरांना अभिवादन केले. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भाजपची जी भूमिका आहे तीच माझी असेल, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
सावरकरांना अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोणत्या अवस्थेत रत्नागिरीतील या कोठडीत दोन वर्ष काढावी लागली असतील याची कल्पना या कोठडीचा आकार पाहिल्यावर येते. हे पाहिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशप्रमाबद्दल, देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना येते. त्यामुळे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढे मी नतमस्तक झालो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका आहे. माझी दुसरी कुठलीही भूमिका नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.
स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करणे आवश्यक
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यसेनांनीनी आपल्या प्राणांचा आणि घरादाराचा त्याग केला त्यांचे स्मरण करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. त्यामुळेच रत्नागिरीत मी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाची मी भेट घेत आहे. देशाची प्रगती करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे त्यांच्याच मार्गदर्शनात मी मंत्रिमंडळात काम करत असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community