केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत केलेल्या विधानानंतर मंगळवारी हा मुद्दा चांगलाच गाजला. राणेंना अटक करण्यापासून ते त्यांना जामीन मिळेपर्यंत अनेक राजकीय घडामोडी मंगळवारी एकाच दिवशी पहायला मिळाल्या. मात्र, राणेंना अटक करायची, हे राणेंनी केलेल्या व्यक्तव्यानंतर म्हणजेच सोमवारी ठरले असल्याची माहिती मिळत आहे.
राणेंच्या अटकेचे हे सूत्रधार
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर, राणेंना आणि विशेषतः भाजपला धडा शिकवायचाच, असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम संमती नंतरच राणेंवर अटकेची कारवाई करण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे.
(हेही वाचाः भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागेल… राणे-भाजपविरुद्ध शिवसेनेचा जंगी ‘सामना’)
म्हणून राणेंना अटक
नारायण राणे यांना अटक करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले विधान. असं विधान करणाऱ्यांना आताच धडा शिकवला नाही, तर उद्या अशा पद्धतीची विधाने सातत्याने होत राहतील. त्यामुळे अशी विधाने केल्यानंतर काय होऊ शकतं, हे ठाकरे सरकारला दाखवून द्यायचे होते. याचमुळे केंद्रीय मंत्रीपदी असतानाही राणेंना अटक करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला.
असे रंगले अटकसत्र
राणेंच्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांच्यावर पुणे, नाशिक, महाड याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणे यांना अटक होणार असे वातावरण मंगळवारी सकाळपासून तयार झाले होते. आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान संगमेश्वर येथे असताना, दाखल झालेल्या गुन्ह्यांबद्दल राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु हा अर्ज रत्नागिरी न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंच्या चिंतेत वाढ झाली होती. अखेरीस महाड न्यायदंडाधिका-यांनी राणेंचा जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची सुटका झाली आहे.
(हेही वाचाः नारायण राणेंना अखेर जामीन मंजूर)
काय होते राणेंचे वक्तव्य
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयात भाषण करताना मुख्यमंत्री हिरक महोत्सव म्हणत होते, त्यांना अमृत महोत्सव हे माहित नव्हते, मी तिकडे असतो तर कानाखाली मारली असती, असे वक्तव्य राणे यांनी वक्तव्य केले होते.
Join Our WhatsApp Community