‘…तर बावनकुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो’, फडणवीसांसमोर गडकरींचे मोठे विधान

116

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर भाजपच्या कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी फडणवीस जर केंद्रात गेले तर बावनकुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो, असे विधान गडकरी यांनी केले आहे.

काय म्हणाले गडकरी?

आपल्यामधील एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. जो पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे मी बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाहीय. नाहीतर आजकाल प्रसारमाध्यमं मी जे बोललो नाही ते सुद्धा माझ्या नावावर खपवतात. मुख्यमंत्री हे फडणवीसच झाले पाहिजेत, पण फडणवीस जर का केंद्रात गेले तर बावनकुळे यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार होऊ शकतो, असं नितीन गडकरी म्हणाले आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

(हेही वाचाः ‘मी काय राऊतांची रिप्लेसमेंट आहे का?’, अमित ठाकरेंचा टोला)

एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान

बावनकुळे यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे त्यांना आगामी काळात पक्षाची सेवा करण्याची नामी संधी आहे. पिता-पुत्र किंवा आई-मुलाचा भाजप हा पक्ष नाही. एक रिक्षाचालक असलेला सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तो आपल्या कर्तृत्वानं, हे खरं भाजपचं वैशिष्ट्य आहे. एका सच्चा कार्यकर्त्याचा सन्मान होणं हे फडणवीस आणि माझ्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे, असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.