मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शीवतीर्थावर घेतलेल्या सभेत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर युतीचं सूत जुळल्याचा अंदाज देखील राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता.
पण आता याच चर्चांना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे. जोपर्यंत राज ठाकरे परप्रांतीयांबाबत आपली भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत युती होणं शक्य नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या भेटीचे सांगितले कारण, म्हणाले …)
काय म्हणाले दानवे?
भाजप आणि मनसे मधील वाढत्या जवळीकीबाबत रावसाहेब दानवे यांना विचारले असता, जोपर्यंत राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती होणं शक्य नाही, असं दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. तसेच नितीन गडकरींनंतर आता माझी आणि राज ठाकरे यांची सुद्धा भेट होणार आहे. अधिवेशनानंतर मी त्यांना भेटणार आहे, पण आमच्यातला विषय राजकीय नसून वेगळा आहे, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
गडकरींनी सांगितलं भेटीमागचं कारण
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत भाजपवर एकही टीका केली नाही. त्यानंतर लगेच दुस-या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना चांगलंच इंधन मिळालं. पण या भेटीचं कारण आता गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवले होते. म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती.
(हेही वाचाः “तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा…”, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community