केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची गुप्त भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे टोपे यांना भेटण्यापूर्वी त्यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याने टोपे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का, अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.
(हेही वाचा – “जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार, भेदभाव सोनं लुटूया हिंदुत्वाच्या विचारांचं…” दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे सूचक ट्वीट)
रावसाहेब दानवे मंगळवारी अर्जुन खोतकर यांच्या घरी दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. त्यानंतर ते लागलीच राजेश टोपे यांच्या निवासस्थानी पोहोचले. जालना जिल्ह्याचे राजकारण प्रामुख्याने दानवे-खोतकर-टोपे यांच्याभोवती फिरते. त्यामुळे या तीन मातब्बर नेत्यांच्या भेटींना विशेष महत्त्व आले आहे.
भाजपा की शिवसेनेत जाणार?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाच्या मदतीने भाजपाने संभाजीनगर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या कामांना ब्रेक लावला जात असताना अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात भरघोस निधी दिला जात आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, दानवे-टोपे भेटीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. किंबहुना टोपे भाजपात जाणार शिवसेनेत, अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community