एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे दिसून येत आहे. या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत असतानाच, आता भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले आहे. जी काही कामं करायची आहेत ती लवकर करुन टाका आम्ही आता दोन-तीन दिवसच विरोधी पक्षात असल्याचा सल्ला त्यांनी राजेश टोपे यांना दिला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे.
काय म्हणाले दानवे?
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात एकत्र होते. यावेळी दानवे यांनी राजेश टोपे यांना सल्ला दिला आहे. जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून आम्ही फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहोत, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
(हेही वाचाः आनंद दिघे माझ्यामुळे ‘धर्मवीर’ झाले, राऊतांचे खळबळजनक विधान)
भाजपचे नेते निर्णय घेतील
अजून संधी हवी असेल तर विचार करता येईल असं म्हणत दानवे यांनी 2 ते 3 दिवसांतच राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले.राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील दानवे यांनी फेटाळून लावली.तसेच शिंदे गटाशी युती करायची की नाही याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही, असंही दानवे म्हणाले. मात्र आमच्या पक्षाच्या बैठका जरी सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असंही दानवे यांनी नमूद केलं.
(हेही वाचाः ‘बंडखोर आमदारांचे असंख्य बाप आहेत’, राऊतांची जीभ घसरली)
Join Our WhatsApp Community