मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी केंद्रात मंत्र्यांच्या राजीनाम्यांना सुरुवात! यांनी दिले राजीनामे

नवीन मंत्रीमंडळ विस्तारात तरुण चेह-यांना प्रधान्य दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

75

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. हा मंत्रीमंडळ विस्तार बुधवार 7 जुलै रोजी संध्याकाळी होणार आहे. यावेळी कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता झपाट्याने घडामोडी घडत आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आपले राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातून यांनी दिले राजीनामे

केंद्रीय मंत्रिमंडळातील सध्याच्या अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, थावरचंद गहलोत, सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, सदानंद गौडा, केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक पोखरियाल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नवीन मंत्रीमंडळ विस्तारात तरुण चेह-यांना प्रधान्य दिले जाणार असल्याची चर्चा आहे. संध्याकाळी 6 वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडणार आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश!)

25 हून अधिक मंत्री घेऊ शकतात शपथ

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांना काही पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच राजीनामे दिलेल्या काही मंत्र्यांना इतर मंत्रीपदे देण्यात येणार असल्याचे समजते. थावरचंद गहलोत यांची नियुक्ती कर्नाटकचे राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. तर डॉ. हर्षवर्धन यांनाही दुस-या विभागाचे मंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 25हून अधिक मंत्री संध्याकाळी शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रातून यांची लागणार वर्णी

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यापासून महाराष्ट्राच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात रंगली आहे. यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील यांची नावे जवळपास मंत्रीपदावर कोरली गेली आहेत. तर हिना गावीत, भारती पवार, भागवत कराड, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यापैकी सुद्धा काही नेत्यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. हे सर्व नेते सध्या दिल्ली दरबारी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.