विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर!विद्यापीठे राजकीय अड्डा बनणार! फडणवीसांचा हल्लाबोल

76

सरकारचे विद्यापीठ सुधारणा विधेयक हे नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांवर प्रतिगामी पद्धतीनं कब्जा करण्याचा सरकारचा प्रयत्न  आहे. उद्या विद्यापिठाच्या खरेदीपासून ते कोणत्या कोर्सला मंजुरी द्यायची, इथपर्यंतचे सगळे अधिकार सरकारनं या विधेयकाच्या माध्यमातून स्वतःकडे घेतले आहेत. या विधेयकामुळे विद्यापीठं राजकीय अड्डा बनणार आहेत, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाचे अखेरचे सत्र प्रचंड गाजले. विधानसभेत आणण्यात आलेल्या आणि मंजूर करण्यात आलेल्या विद्यापीठ  दुरुस्ती विधेयकावरुन जोरदार खडाजंगी झाली. हे विधेयक आणण्याचे आणि घाईघाईने मजूर करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोकशाहीचा सर्वात काळा दिवस

आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे. ठाकरे सरकार पळपुटे सरकार, हे आज सिद्ध झाले, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. विद्यापिठाच्या कायद्यावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेण्याचे पाप सरकारनं केले, असे फडणवीस म्हणाले.

यापुढे विद्यापीठांच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप

आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यातून मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबतीत ढवळाढवळ करण्याची तरतूद नव्हती. विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवली गेली होती. पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी स्वतःला प्र-कुलपती म्हणवून घेतले आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि ऍकेडमिक बाबींमध्ये आता सरकारला हस्तक्षेप करायचा आहे, म्हणून हे केले गेले असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

राज्यपालांकडे दाद मागणार

हे विधेयक संविधान विरोधी असून राज्यपालांकडे आम्ही याची तक्रार करणार आहोत. प्रत्येक विद्यापीठात भाजप या विधेयकाविरोधात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. आता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले, तसे घोटाळे होऊन उद्या डिग्री सरकारनं विकायला काढल्या तरीआम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.