राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला तुतारी हे चिन्हे दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या नवीन चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावर केले. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर होते.
सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष
रायगड किल्ल्यावर पक्षाच्या अनावरण चिन्हासाठी शरद पवार हे तब्बल ४० वर्षांनी किल्ल्यावर आले. आधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आले. त्याठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. याठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असे त्यांनी म्हटले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र किल्ल्यावर पक्षाच्या चिन्हाचे अनावरण होत आहे. ही तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात स्वाभिमानाचे प्रतिक बनली आहे, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community