धर्मांतराचे दहशतवादी कनेक्शन : पाकिस्तानसह आखाती देशांपासून बीडपर्यंत पसरले जाळे!

धर्मांतराच्या मुद्द्यावरून देशात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशात धर्मातराचे जे कारस्थान उघडकीस आले आहे, हा दहशतवादाचा एक भाग असल्याचे आता पुराव्यानिशी सिद्ध होऊ लागले आहे.

76

मूक-बधीर मुले-मुली, गरीब, अबला महिला यांचे धर्मांतर घडवून आणणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढत चालली आहे. या कटकारस्थानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी संघटना आणि धर्मांधांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहे. धर्मांतर घडवून आणणारी टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी उत्तर प्रदेशातील एटीएस कार्यरत झाली आहे. या एटीएसने उघडकीस आणलेले धर्मांतराच्या रॅकेटचा थेट संबंध हा पाकिस्तान, मुसलमान राष्ट्रांपासून ते महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यापर्यंत असल्याचे सामोर आले आहे. ज्यामध्ये ओसामा बिन लादेनच्या जवळच्या मित्राचाही संबंध समोर आला आहे.

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने हिंदूंचे मुसलमान धर्मात धर्मांतर करणाऱ्या टोळीतील ज्या तिघांना अटक केली आहे. त्यातील एक आरोपी हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहे. तो केंद्र सरकारचा कर्मचारी आहे. या प्रकरणात आधी २ मौलवींना अटक करण्यात आली होती. मौलवी महंमद उमर गौतम आणि मौलवी मुफ्ती काझी जहांगीर आलम कासमी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांची चौकशी केल्यानंतर एटीएसने तीन जणांना अटक केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा इरफान शेख, दिल्लीतील राहूल भोला आणि हरियाणातील अब्द्दुल मन्नाब अशी त्या तिघांची नावे आहेत.

(हेही वाचा : उत्तर प्रदेशातील धर्मांतराचे बीड कनेक्शन!)

तो गद्दार निघाला! 

या प्रकरणात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील इरफान शेख हा केंद्र सरकारमधील बाल विकास मंत्रालयात दुभाषक म्हणून नोकरी करतो. तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा गावातील आहे. तिथेच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. सध्या तो प्रोफेसर म्हणून कार्यरत होता.

विदेशातून अर्थपुरवठा! 

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महानिदेशक (कायदा) प्रशांत कुमार यांनी म्हटले कि, या धर्मांतरासाठी विदेशातून पैसा पुरवण्यात आला होता. ज्यामध्ये आतापर्यंत १ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हा पैसा २०१० ते २०२१ दरम्यान आला आहे. हा पैसा कतार, दुबई आणि अबुधाबी येथून आला आहे.

हा पैसा उमर गौतम हा त्याची संस्था आणि त्याच्या कुटुंबीयांच्या खात्याद्वारे ट्रान्स्फर करायचा. उमर गौतम याची संस्था फातिमा चॅरिटेबल ट्रस्ट ही आहे. या संस्थेच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले आहेत. यामध्ये विदेशी मुद्रा अधिनियम २०१० च्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी हवाला रॅकेटद्वारे पैसे आले होते का, याचाही शोध एटीएस घेत आहे. याशिवाय २ कोटी रुपये गुजरातमधील व्यापाऱ्याच्या माध्यमातून आल्याचे समोर आले आहे. याचा तपास एटीएस करत आहे. ज्याच्या नंतरच या प्रकरणातील आणखी काही खुलासे होतील.

(हेही वाचा : ‘तो’ मौलवी निघाला अब्जाधीश! धर्मांतरासाठी शाळकरी हिंदू मुलांना नमाज पढायला सांगायचा!)

हे धर्मांतराचे षडयंत्र किती खुलेआम चालायचे याचे पुरावेही समोर आले आहेत. ज्यामधे महंमद उमर याने तीन वर्षांपूर्वी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करताना धर्मांतराच्या अजेंड्याचा खुलासा केला होता.

उमर गौतमच्या संस्थेचे दहशतवाद्यांशी संबंध? 

उमर गौतम याची संस्था इस्लामिक दावा सेंटरला जो निधी मिळाला तो कतार येथूनही आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इस्लामिक दावा सेंटरचा बिलाल फिलिप्स याची इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे, त्याचे कतारसोबतही संबंध आहे. बिलाल फिलिप्स जमाईका-कॅनडाचा नागरिक आहे. तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खास मित्र होता.

दहशतवाद्यांचा दुसरा म्होरक्या!

बिलाल फिलिप्स हा कट्टरवादी विचारांचा धर्मांध म्हणून ओळखला जातो. त्याला ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, केनिया आणि जर्मनी या देशात प्रवेश बंदी आहे. बांगलादेशने त्याला हाकलून लावले होते. फिलिपाईनने त्याला अटक केली होती. बिलालकडे जेवढा पैसा आहे, तो त्याचा उपयोग धर्मांतरासाठी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिलाल फिलिप्सचा संबंध दहशतवादी संघटनांशी आहे. ज्यामध्ये तरुणांची ऑनलाईन भरती करण्यात येते.

(हेही वाचा : धक्कादायक! ISI च्या पैशावर उत्तर प्रदेशातील १ हजार हिंदूंना बनवले मुसलमान!)

कट्टरपंथीयांनी केला विरोध 

भारतातील इस्लामी कट्टरपंथी संस्थांनी उत्तर प्रदेश एटीएसच्या कामाचा विरोध केला आहे. ते सरकारच्या धर्मांतर विरोधी कायद्याचाही विरोध करतात. मात्र आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आणि शत्रू राष्ट्राकडून येणाऱ्या पैशाच्या माध्यामातून जे देशविरोधी कृत्य केले जात आहे, त्याविषयी चकार शब्द काढत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.