शिवसेनेसोबत जायचं की सरकारमधून बाहेर पडायचं? ‘हा’ पक्ष द्विधा मनस्थितीत!

113

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्षाची मनस्थिती सध्या द्विधा अवस्थेत असल्याचे दिसून येते. एका बाजूला मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत एकला चलो रे चा नारा दिला असला तरीही निवडणुकीत सामोरे जाताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करून चालणार नाही. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्याने महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेने विरुद्ध बोलल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडी करावी किंवा सरकारमधून बाहेर पडावे असाच पवित्रा काँग्रेसच्या काही गटांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस होणार युती?

मुंबई महापालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही घटक पक्ष एकत्र असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस या दोन्ही पक्ष सोबत जाण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेसने प्रथमपासूनच स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष २३६ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर करून टाकले आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून राज्यातील नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मिळालेले यश पाहता ही आघाडी व्हावी, अशी शिवसेना आणि काँग्रेसची तीव्र इच्छा आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेतील निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवत भाजप समोर कडवे आव्हान निर्माण करावे अशी त्यांची रणनीती आहे.

महापालिकेत शिवसेना सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात

मुंबई महापालिकेवर मागील २२ वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता होती. परंतु २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटली आणि या निवडणुकीत शिवसेनेने ८४ आणि भाजपने ८२ जागी आपापले नगरसेवक निवडून आणले. भाजपची ही वाढती ताकद शिवसेनेच्या चिंतेत भर टाकणारी आहे. त्यामुळे मागील २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेचा आपली सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न आहे. भगवा ध्वज भाजपला खाली खेचण्याची संधी मिळू नये याकरता शिवसेनेलाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत ची आघाडी ची गरज निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे भाजपने या निवडणुकीची जोरदार तयारी करत कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच महापौर बसण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सेनेच्या गोटात थोडी हलचल सुरु झाली आहे. मात्र काँग्रेसने काढता पाय घेतल्याने आता शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता स्वबळाची भाषा बोलून दाखवली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलली जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्या समित्या गठित: ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी)

याच मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. त्यात काही नेत्यांनी तर महापालिका निवडणुकीला अशा परिस्थितीत आपण सामोरं जायचं कसं असे प्रश्न उपस्थित केले. मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. तर दुसरीकडे राज्यात महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील आहोत. मग महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना महापालिकेतील भ्रष्टाचार, घोटाळे तसेच विकास कामांवर बोलावं लागणार आहे. परंतु सरकारमध्ये सामील असल्याने आम्ही तसे बोलू शकत नाही किंबहुना सेनेवर टीका करताना अडचणी येतील असे मत मांडले. आणि जर बोललो तर पक्षाचीही अडचण होणार. या निवडणुकीत केंद्राच्या कारभारावर बोलून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करता येणार नाही. या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी पक्षावरच टीका करावी लागणार आहे. आपण राज्यात त्यांच्यासोबत सरकारमध्ये असल्याने सेनेवर खुलेआम टीका करू शकत नाही. अशा परिस्थितीत एक तर आपण राज्यातील सरकार मधून बाहेर पडावे, जेणेकरून शिवसेनेच्या कारभारावर टीका करता येईल. अन्यथा सेनेसोबत जाऊन आघाडीच्यावतीने एकत्र पणे निवडणूक लढवावी. त्यामुळे पक्षाने याबाबत विचार करावा, अशी सूचनाही काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.