वंदना बर्वे
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून सभागृहात झालेल्या गोंधळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावे लागले. मणिपूरमध्ये दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्यावरून शुक्रवार, २१ जुलै रोजी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ बघायला मिळाला. सरकारने मणिपूरच्या मुद्यावर चर्चा करावी अशी काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांच्या नेत्यांची मागणी आहे. तर, विरोधकांना चर्चा नको आहे म्हणून गोंधळ घालत आहेत असा आरोप सरकारकडून करण्यात आला. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यसभेचे कामकाज दोनदा आणि लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभेचे कामकाज पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले. सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. १२ वाजून १० मिनिटांनी कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा आपल्या मागणीबाबत गदारोळ सुरू केला. यानंतर सभापतींनी सोमवार, २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरबाबत जे विधान केले आहे ते सभागृहाबाहेर केले आहे. मुळात, त्यांनी आधी सभागृहात वक्तव्य द्यायला हवे होते आणि नंतर बाहेरही देता आले असते. अधिवेशन सुरू आहे. सभागृह चालत असताना सरकारने जी माहिती द्यायची आहे ती आधी सदस्यांना दिली जाते. कारण, ते आपले कर्तव्य आहे. पंतप्रधानांनी केलेली ही चूक होय. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी मागणी खर्गे यांनी यावेळी केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मला वाटते की विरोधक चर्चेबाबत गंभीर नाहीत कारण मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. या प्रकारामुळे संपूर्ण देशाची मान लाजेने खाली वाकली आहे. दस्तुरखुद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे, असे राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, उद्या संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये जे काही घडले त्यामुळे देशाने लाजेने मान खाली असल्याचे म्हटले आहे. हा एक गंभीर आणि संवेदनशील प्रश्न आहे. सर्व समाज त्रस्त आहेत. गुन्हेगारांना पकडायचे आहे, काल काहींना अटक करण्यात आली आहे आणि बाकीच्यांना पकडण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही याची मला खात्री आहे.
(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; अंधेरी सबवेसह अनेक सखल भाग पाण्याखाली)
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, विरोधक चर्चेपासून का पळत आहेत? जेव्हा देशातील जनता एका अपेक्षेने संसदेच्या अधिवेशनाकडे पाहते आणि हे विरोधी पक्ष त्यांना मुद्दे मांडू देत नाहीत, चर्चेत सहभागी होत नाहीत, तेव्हा त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. आम्ही संवेदनशील आहोत आणि चर्चेत भाग घ्यायचा आहे, पण विरोधक जबाबदारीपासून दूर पळत असून चर्चेपासूनही पळ काढत आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी विरोधी पक्षांचा चांगला समाचार घेतला. विरोधकांना चर्चा नको आहे म्हणून केवळ गोंधळ घालण्याचे काम करीत आहे. विरोधकांना समाधान नको आहे. विरोधक स्पीकर हातात पकडून जोराजोरात ओरडत आहेत. विरोधकांनी सहकार्य केले तर आजही चर्चा सुरू होवू शकते. सरकारला सुध्दा या प्रकरणावर चर्चा घडवून आणायची आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी सरकारची इच्छा असल्याचे सांगत चिराग पासवान यांनी विरोधकांना धारेवर धरले.
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मणिपूरच्या घटनेची देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात चर्चा होत आहे. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे चर्चा करण्याची मागणी केली होती. परंतु, पंतप्रधानांनी सभागृहात बोलायचे सोडून बाहेर बोलून मोकळे झालेत, असा आरोप चौधरी यांनी केला. सरकार सभागृहात सांगते की ते चर्चेसाठी तयार आहेत. मात्र, विरोधकांना सभागृहात बोलायची संधी दिली जात नाही, असेही ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community