पंतप्रधान मोदींचे गुजरातवर प्रेम, तुमचेही महाराष्ट्रावर असले पाहिजे; UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र 

114

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं गुजरातवर प्रेम आहे. तसं तुमचं महाराष्ट्रावर असलं पाहिजे. गुजरातमध्ये अनेक गोष्टी आल्या पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं. ते वाटणं चुकीचं नाही. स्वाभाविक आहे. मोदींचं जसं गुजरातवर प्रेम आहे, तसाच तुमच्या मनातूनही महाराष्ट्र जाता कामा नये, असा कानमंत्र मनसे नेते राज ठाकरे यांनी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला. UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या तरुणांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला.

आजकाल नेते अधिकाऱ्यांना काहीही बोलत असतात. राजकारणी बदलत असतात. अधिकारी कायम असतात. राज्यात मुख्यमंत्री येत जात असतात तुम्ही तुमची बलस्थाने ओळखा. एक आयएएस अधिकारी मंत्रालयाबाहेर उभा राहुन मुख्यमंत्र्यांना जोरजोरात शिव्या देत असतो. त्यावेळी इतर लोकांनी विचारलं तुला भीती वाटतं नाही का? तर त्यावर त्याने उत्तर दिलं मुख्यमंत्री टेंपरेरी असतो मी पर्मनंट आहे, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. त्यावेळी एकच हशा पिकला.

(हेही वाचा Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?)

राज्यावर प्रेम ठेवा

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनी महाराष्ट्रात आपला प्रकल्प व्हावा यासाठी आली होती. त्यावेळी विलासराव देशमुख यांना काही कारणास्तव मीटिंगसाठी उपस्थित राहणे शक्य नव्हतं. त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बैठकीसाठी पाठवले. तो अधिकारी साऊथ इंडियन होता. त्याने सुरुवातीपासूनच कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर नन्नाचा पाढा लावला आणि प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही. कंपनी नाराज झाल्यानंतर त्याने तात्काळ आपल्या राज्यातील मित्राला फोन करून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले आणि संबंधित प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेल्याचा पाहायला मिळालं. अधिकारी म्हणून कुठेही काम करा. परंतु आपल्या राज्याबाबत प्रेम असू द्या, असंही त्यांनी सांगितलं.

यालाच लोकशाही म्हणतात

आपल्या राज्यात लोकशाही आहे आणि त्यामुळेच दहावीला 42 टक्के पडलेला माणूस आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. तुमचा सत्कार करत आहे. यालाच लोकशाही म्हणतात, अशी मिश्किल कोटीही राज यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.