मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता आदींच्या बदल्या आणि बढत्यांचे आदेश हे नगर अभियंता आणि संचालक (अभियांत्रिकी सेवा प्रकल्प) आदी विभागांमधून निघत असून त्यामध्येच घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे याबाबत आपण महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना तक्रारींचे निवेदन दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बदल्या आणि बढत्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
एक अधिकारी आठ वर्षांपासून नगर अभियंता आणि संचालक विभागात
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना नगर अभियंता आणि संचालक या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचाही आरोप केला आहे. अभियंत्यांची बदली व बढती करताना कुणाला कुठल्या विभागात पाठवायचे याचे हेच विभाग ठरवत असते. यामध्ये लेन देन असते आणि त्याआधारेच या बदल्या आणि बढत्यांमध्ये क्रिम पोस्ट मिळत असते. याच विभागात एक अधिकारी आठ वर्षांपासून आहे. यांच्याशिवाय हे विभाग चालत नाही का, असा सवाल करत महापालिकेला वाचवायचे असेल, तर या विभागाकडे लक्ष द्या, असेही आयुक्तांना सांगितले आहे, असे ते म्हणाले.
(हेही वाचा : राणी बाग सोमवारपासून खुली! कुणाला मिळणार प्रवेश?)
प्रस्ताव आणण्याची एवढी भीती का वाटते?
आपला कोणाच्याही पदोन्नतीला विरोध नाही किंवा पदोन्नतीच्या प्रस्तावालाही विरोध नाही. परंतु आदल्या रात्री अशाप्रकारे पदोन्नतीचे प्रस्ताव आणायचे आणि सकाळी घाईगडबडीत मंजूर करायचे हे योग्य नाही. स्थापत्य शहर समितीमध्ये अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर केला. हा प्रस्ताव तीन दिवस अगोदर का आणला नाही, असा सवाल करत राजा यांनी सत्ताधारी पक्षाला आणि अध्यक्षांना वेळेत हा प्रस्ताव आणण्याची एवढी भीती का वाटते, असाही सवाल त्यांनी केला.
Join Our WhatsApp Community