राज्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरल्यापासून त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पसरत असल्याचे पहायला मिळत आहे. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर्सवर बंधने घालण्यात आल्यानंतर, आता उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावणे अनिवार्य असल्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, याबाबतचे निर्देश सर्व मदरशांना देण्यात आले आहेत. हे निर्देश राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये लागू करण्यात येण्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ज्ञानवापी मशिद प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका: मशिदीचे सर्वेक्षण होणारच; न्यायालयाचा आदेश)
योगी सरकारचे निर्देश
मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना मदरशांमध्ये शिक्षण देण्यात येते. सध्या उत्तर प्रदेशातील मदरशांना रमजानची सुट्टी देण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा मदरशांमधले शिक्षण सुरू झाले आहे. त्यानंतर आता राज्यातील सर्व मदरशांमध्ये इतर शाळांप्रमाणे राष्ट्रगीत अनिवार्य असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने 9 मे रोजी राज्यातील सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिका-यांना एक परिपत्रक बजावले होते. 24 मार्च 2022 रोजी पार पडलेल्या परिषदेच्या बैठकीत मान्यता प्राप्त, अनुदानित किंवा गैर अनुदानित मदरशांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून मदरशांमधील नित्याच्या प्रार्थनेबरोबरच सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असल्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आदेशाचे पालन करण्यासाठी देखरेख
उत्तर प्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आता सर्व मदरशांमध्ये भारताचे राष्ट्रगीत अनिवार्य करणअयात येत आहे. या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना सर्व जिल्हा कल्याण अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या आदेशाचे पालन नियमितपणे होत आहे की नाही याची देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकारी काम करणार असल्याचेही अन्सारी यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः मुस्लिमांचाही राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला विरोध)
Join Our WhatsApp Community