समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश येथील आमदार आझम खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आझम खान यांना चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पण या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एका महिन्याचा अवधी असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील रामपूरच्या मिलक विधानसभा मतदार संघातील समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात चिथावणीखोर भाषण केले होते. यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजप नेते आकाश सक्सेना यांनी खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत त्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(हेही वाचाः भावाने बॉम्ब फोडला बहिणीने प्राण गमावला, भाऊबीजेच्या दिवशीच घडली दुर्दैवी घटना)
आमदारकी धोक्यात
आझम खान यांना दोन वर्षांपेक्षा जास्तीच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांचे विधीमंडळ सदस्यत्वही रद्द होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता आझम खान यांच्याकडून या निर्णयाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community