योगी सरकारचे कार्यालय मुंबईत उघडणार! ‘हा’ असणार मुख्य उद्देश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगी सरकार राज्यातील लोकांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत असतात. या योजनेंतर्गत मुंबई सारख्या औद्योगिक महानगरात राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांसाठी राज्य सरकार एक नवीन मार्ग खुला करणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी सरकारचे कार्यालय मुंबईत उघडण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा मुंबईत राहणाऱ्या यूपीच्या स्थलांतरीत लोकांना होणार आहे. मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज यांच्या परप्रांतिय विरोधी भूमिकेमुळे त्यांना उत्तर प्रदेशात होणारा विरोध होत असतानाच या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

स्थलांतरितांसाठी कसा होणार फायदा?

महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतल्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांसाठी आपले कार्यालय उघडणार आहे. यूपी सरकारचे हे कार्यालय मुंबईत राहणाऱ्या यूपीमधील कामगारांच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि सोयी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे 1.84 कोटी आहे, त्यापैकी 50 ते 60 लाख लोक उत्तर भारतातील आहेत आणि त्यापैकी बहुतांश उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशात राहणारे लाखो लोक मुंबईत राहतात, जे उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार, वाहतूक, खाद्य व्यवसाय, कारखाना किंवा मिल अशा अनेक क्षेत्रात काम करतात, त्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना निश्चित फायदा होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – NIA कारवाईतून बड्या नेत्यांची नावे समोर येणार; प्रसाद लाड यांच्या दाव्याने खळबळ)

तसेच, योगी सरकार रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, ज्याद्वारे त्यांना पुढील पाच वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था देशात प्रथम क्रमांकावर आणायची आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला रोजगार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक विभागात सरकार आयटी पार्क उभारत आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, आग्रा, गोरखपूर, वाराणसी आणि बरेली आयटी पार्कचे बांधकाम सुरू आहे, तर मेरठ, प्रयागराज आणि कानपूरमध्ये आयटी पार्क सुरू झाले आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here