राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस द्या! नाना पटोलेंची मागणी

नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणे गरजेचे आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे कोरोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

वयाची अट शिथिल करणे काळाची गरज

यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली ही चांगली बाब आहे. पण तरी सद्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घ्यावी.

(हेही वाचाः लॉकडाऊन की कठोर निर्बंध, अधिकारी-मंत्र्यांमध्ये मतभेद! काय करणार मुख्यमंत्री?)

कोरोनाची साखळी तोडणे सोपे होईल

कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणे गरजेचे आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे सोपे होईल, असेही पटोले म्हणाले.

महाराष्ट्राला लस पुरवठा करा

देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले गेले पाहिजे. महाराष्ट्राला कोरोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करून जनतेनेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले. 

(हेही वाचाः मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार : लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन?)

सरसकट लसीकरण मोहीम राबवण्याची गरज

देशात महामारी ही काही पहिल्यांदा आलेली नाही. काँग्रेसचे सरकार असताना महामारीचा सामना करावा लागला होता. त्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने योग्य नियोजन करुन त्यावर यशस्वी मात केली. पोलिओ लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमणात राबवली. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवल्याने त्यावर मात करण्यात यश आले. पोलिओवर जर मात करता येऊ शकली तर कोरोनावर मात करणेही शक्य आहे. गरज आहे ती केंद्र सरकारने दृढ निश्चय करुन सार्वत्रिकरित्या मोठ्या प्रमाणात तसेच सरसकट कोरोना लसीकरणाची मोहीम राबवण्याची. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केल्यास, कोरोनाच्या महामारीवरही नक्कीच मात करता येईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

(हेही वाचाः पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन! कसे असणार निर्बंध? वाचा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here