लसीकरण केंद्रच ठरणार नगरसेवकांची डोकेदुखी

लसीकरण केंद्रांसाठी जे नगरसेवक पुढाकार घेताना दिसत आहेत, तेच भविष्यात डोक्यावर हात मारुन घेत असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.

मुंबईमध्ये सध्या लसीकरण केंद्र सुरू करण्याचा सपाटाच लागला आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात सध्या लसीकरण केंद्र सुरू केले जात असून सध्या जी केंद्र सुरु आहेत, त्याठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. तर भविष्यात सुरू होणारी सर्व लसीकरण केंद्र ही १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी असणार आहेत. त्यामुळे आता लसीकरणासाठी आजूबाजूच्या प्रभागातील केंद्रांत नागरिकांना जावे लागणार आहे. त्यामुळे ही लसीकरण केंद्रच पुढे नगरसेवकांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२२७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू होणार

मुंबईत महापालिकेच्यावतीने ८० आणि २० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू असून, ७४ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू आहेत. मुंबई महापालिकेने २२७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी आता १३२ खासगी रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत.

(हेही वाचाः लसीकरण केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीसाठी का होते गर्दी? ही आहेत उत्तरे)

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र

सध्या लसीकरणासाठी आपल्या प्रभागातील जनतेला दूरवर जावे लागत असल्याने, प्रत्येक पक्षाचा नगरसेवक आपल्या विभागातील शालेय इमारत, रुग्णालय, दवाखाना, प्रसुतीगृह, समाजकल्याण केंद्र आदी ठिकाणचे पर्याय सूचवून तिथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करत आहे. त्यानुसार काही नगरसेवकांच्या मागण्या मान्य करुन, त्यांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर काहींचे लोकार्पण होऊन लसीकरणाला सुरुवातही झाली आहे.

परंतु आता खासगी रुग्णालयांच्या बरोबरीने महापालिकेच्यावतीनेही १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी केंद्र बनवण्यात येत आहेत. सध्या महापालिकेच्यावतीने नायर, बीकेसी जंबो कोविड सेंटर, सेव्हन हिल्स, राजावाडी, कुपर, वर्ल्ड टॉवर, चुनाभट्टी मॅटर्निटी होम, वांद्रे कम्युनिटी हॉल आदी ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी जी लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत, ती ४५ वर्षांपुढील व्यक्तींसाठी होती, तर यापुढे जेवढी लसीकरण केंद्र तयार केली जाणार आहेत, ती ४४ वर्षांखालील व्यक्तींसाठी असतील.

लसीकरणावरुन नगरसेवक होणार रोषाचे धनी

आपल्या विभागातील जनतेला विभागातच लसीकरण करता यावे, यासाठी नगरसेवकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. पण यापूर्वी जिथे लसीकरण केंद्र सुरू आहेत, तिथे ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. तर नवीन केंद्रांमध्ये ४४ वर्षांखालील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे एका नगरसेवकाच्या प्रभागातील काहींना दुसऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात जावे लागणार आहे. या लसीकरण केंद्रावरुनच आता जनतेच्या रोषाचे धनी नगरसेवकांना व्हावे लागणार आहे.

(हेही वाचाः गैरसोय नको म्हणून शीव रुग्णालयातील लसीकरण केंद्र दुस-या जागेत)

…म्हणून लसीकरण होणार नगरसेवकांची डोकेदुखी

जर एका नगरसेवकाच्या प्रभागात ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे, तेथील ४४ वर्षांखालील नागरिकांना आजूबाजूच्या प्रभागात जावे लागणार असल्याने, त्यांचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आज लसीकरण केंद्रांसाठी जे नगरसेवक पुढाकार घेताना दिसत आहेत, तेच भविष्यात डोक्यावर हात मारुन घेत असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे. त्यामुळे एकाच प्रभागात लसीकरणाची दोन केंद्र सुरू झाल्यास प्रशासनासह नगरसेवकांच्या माथ्यावरील भारही हलका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या मते तर आपल्याला आतापासून त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here