…म्हणून संदीप खरेंनी ‘इर्शाद’चा गाशा गुंडाळला! 

या कार्यक्रमाचे नाव बदलून 'काव्य पहाट' असे देऊन या कार्यक्रमाची जाहिरात कुणीतरी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली.

148

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमाचे अवघ्या महाराष्ट्राने लक्ष वेधून घेतले होते. तो कार्यक्रम दिवाळीनिमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी होणार होता, त्याची तयारी झाली होती, तिकीट विक्री सुरु झालेली. कार्यक्रमाचे सादरीकरण प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि वैभव जोशी करणार होते. या कार्यक्रमाचे स्वरूप ‘दिवाळी पहाट’, असे होते, नाव मात्र ‘इर्शाद’ होते. त्यामुळे साहजिकच ‘हे असे नसते उद्योग दिवाळीच्या मुहूर्तावर कशासाठी?’, अशी विचारणा हिंदूंकडून होऊ लागल्यावर संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी ‘इर्शाद’चा गाशा गुंडाळला.

…तर कार्यक्रम बंद पाडू! 

या कार्यक्रमाच्या नावावरून त्याला समाजातून विरोध होऊ लागला, सोशल मीडियात तर संदीप खरे यांच्या विरोधात टीकेचा सूर ऐकू येऊ लागला. इतकेच नव्हे तर थेट फोन वरून कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला. नाशिक येथील हिंदू धर्मरक्षक संघटनेचे प्रमुख उदय उपासनिक यांनी या कार्यक्रमाला फोनवरून तीव्र शब्दांत विरोध केला. ‘कार्यक्रम करणारे संदीप खरे, जोशी, तिकीट विकणारे सरनाईक, मी स्वतः उपासनिक, आपण सर्व जण हिंदू, दिवाळी सण हिंदूंचा, असे असताना कार्यक्रमाला नाव ‘इर्शाद’ का? काय संबंध याचा? रमझान, ईद सुरु आहे का? हिंदूंकडून पैसे घेणार, त्यांना तिकीट विकणार, हिंदू कार्यक्रमाला येणार, नाव मात्र हे का? एक तरी मुसलमान तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे का? बांगलादेश, पश्चिम बंगाल, काश्मीरमध्ये काय सुरु आहे, यांची कल्पना नाही का? या कार्यक्रमाचे नाव बदला, अन्यथा हा कार्यक्रम बंद पाडू’, असा इशारा उपासनिक यांनी दिला. सोशल मीडियात हा कॉल रेकॉर्ड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(हेही वाचा : नरेंद्र मोदी इटलीमध्ये बोलतात मराठी, गुजराती! कसे आणि कुणाशी? जाणून घ्या…)

सोशल मीडियातून विरोध! 

त्याच प्रमाणे सोशल मीडियातूनही या कार्यक्रमाला विरोध झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे नाव बदलून ‘काव्य पहाट’ असे देऊन या कार्यक्रमाची जाहिरात कुणीतरी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. तसेच खरे आणि जोशी यांचा चांगलाच समाचार घेतला.

अखेर संदीप-वैभव यांची माघार 

त्यानंतर वैभव जोशी यांनी फेसबुक पोस्ट करून हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे इर्शाद हे नाव बदलून काव्य पहाट केल्याची जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. ही जाहिरात नेमकी कशी आली, याबाबत माहित नसल्याचे वैभव जोशी यांनी म्हटले आहे. मागील पाच वर्षांपासून रसिकांच्या भरभरून प्रतिसादासह इर्शाद हा कार्यक्रम होत आहे. भारतात आणि भारताबाहेरही याचे प्रयोग झाले आहेत. कुठल्याही निमित्ताने नव्हे तर प्रामुख्याने मराठी कवितांसोबतच हिंदी, उर्दू कविताही यात सादर होत असल्याने, काव्यमैफलीला समर्पक अशा ‘इर्शाद’ या शीर्षकानेच भविष्यातही हा कार्यक्रम करावयाची इच्छा आहे. विचारांती नाव न बदलण्याचे ठरल्यावर हा कार्यक्रम आणि त्या नुसार साहजिकच पुढील जाहिरात रद्द करावी असे ठरले व त्याप्रमाणे वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी जाहिरात आली नाही! या साऱ्या पार्श्वभूमीवर, 5 नोव्हेंबर 2021चा कार्यक्रम दुर्दैवाने रद्द झाला आहे, असेही वैभव जोशी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.