लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले असताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी नाना पटोलेंवर आक्षेप घेतला. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही हे स्पष्ट नसताना ते आमच्याशी पत्रव्यवहार करत आहेत. जागा वाटपाबाबत अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे नेते निर्णय घेतील, असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, मंगळवारी देण्यात आलेल्या त्या पत्रावर अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची सही नाही, असे स्पष्ट करत महाविकास आघाडीत वंचितचा (Vanchit Bahujan Aghadi) अद्याप समावेश झाला नसल्याचा खुलासा आंबेडकर यांनी आज अकोल्यात बोलताना केला. त्यांच्या या खुलाशामुळे वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबतचा संभ्रम कायम आहे.
महाविकास आघाडीकडे केली मागणी
परवा, मंगळवारी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीत वंचितचा (Vanchit Bahujan Aghadi) समावेश करण्याचा निर्णय झाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रसार माध्यमांना माहिती दिली. तसेच २ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आंबेडकर सहभागी होतील, असे राऊत यांनी सांगितले होते. आंबेडकर यांनीही एक्स या समाज माध्यमातून आपण बैठकीत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आंबेडकर यांनी आज वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) समावेशाचा आणि काँग्रेस नेत्यांच्या मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचे असेल तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने मान्यता दिली पाहिजे. त्यामुळे तशी मान्यता दिली आहे की नाही हे अद्याप आम्हाला माहिती नाही, असे आंबेडकर म्हणाले. कालच्या बैठकीत आम्ही ओबीसी आरक्षणाचा, मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने निर्माण झालेला मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. तसेच दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले आणि तीन काळ्या कृषी कायद्याला स्थगिती दिली. त्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीने स्पष्ट करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community