Vanchit Bahujan Aghadi ची राजकीय ताकद घटली ?

मविआ, युतीकडून प्रस्तावच नाही; तिसरी आघाडी, एमआयएम, जरांगेंकडूनही अंतर

72
Vanchit Bahujan Aghadi ची राजकीय ताकद घटली ?
  • प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपल्यासोबत यावे यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी किंवा महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी मात्र या आघाडीला गृहीतही धरलेले दिसत नाही. लोकसभा निवडणुकीवेळी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बदललेल्या भूमिका आणि त्यांना निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सर्वसाधारण मत आहे. शिवसेना (उबाठा) आणि वंचितच्या युतीची घोषणा उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आंबेडकर यांनी संयुक्तपणे केली होती. लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेत वंचितने सुरुवातीपासूनच मोठा वाटा मागितला होता. चर्चेत एक-दोन जागांवरून पाच जागा सोडण्यापर्यंत मविआची तयारी होती. परंतु हेही मान्य नसल्याचे आणि प्रस्थापित नेत्यांच्या वळचणीला जाणार नसल्याचे सांगत आंबेडकर यांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. आंबेडकर यांचा स्वतंत्रपणे लढण्याचा हा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या फायद्याचा ठरला नाही.

(हेही वाचा – Mumbai Local : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प)

वंचित स्वतंत्र लढूनही आघाडीला नुकसान नाही

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) कामगिरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. वंचित आघाडीमुळे २०१९ सारखी भाजपाविरोधी मतांची विभागणी होऊन त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसेल, अशी भीती मविआ नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालात ही भीती साफ खोटी ठरली. वंचित आघाडीला राज्यात मतदारांनी फारशी पसंती दिली नाही. राणाभीमदेवी थाटात घोषणा झालेल्या वंचितच्या ३५ पैकी एकाही उमेदवाराला विजयाचा गुलाल उधळता आला नाही. पाठिंबा दिलेल्या इतर पक्षांच्या सात उमेदवारांपैकी केवळ तीन उमेदवार विजयी होऊ शकले. दुसरीकडे वंचित आघाडीने आपल्यासोबत यावे यासाठी आंबेडकर यांची शेवटपर्यंत मनधरणी करणाऱ्या मविआने मात्र राज्यातील लोकसभेच्या चक्क ३० जागा जिंकत दमदार कामगिरी केली. वंचित आघाडी स्वतंत्रपणे लढूनही मविआचे कोणतेही नुकसान न झाल्याने मविआचे नेते सध्या तरी निश्चित आहेत. त्यामुळेच विधानसभेसाठी मविआकडून वंचितला अद्याप तरी कोणताही प्रस्ताव देण्यात आला नसून लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूकही वंचितशिवाय लढवण्याची तयारी मविआ नेत्यांनी केली असल्याचे दिसते.

(हेही वाचा – Navi Mumbai Municipal Corporation पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी)

वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याऐवजी राजरत्न आंबेडकर

तिसरी आघाडी गठित करण्यासाठी एकत्र आलेल्या संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याऐवजी राजरत्न आंबेडकर यांच्याशी बोलणी करून तिसऱ्या आघाडीसाठी मोटबांधणी सुरू केली आहे. तिसरी आघाडीही वंचितशी युती करण्याबाबत उत्सुक नसल्याचे चित्र त्यामुळे स्पष्ट होते आहे. सुरुवातीला मराठा आरक्षणासाठीचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत राजकीय युती करण्याची घोषणा करणाऱ्या आंबेडकर यांच्यापासून जरांगे यांनीही दोन हात अंतर राखणेच पसंत केलेले दिसते. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही जरांगे यांची आग्रही मागणी असून आंबेडकर यांनी त्यालाच विरोध केला आहे. वंचितची पूर्वी एमआयएमसोबत (ऑल इंडिया मजसिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) युती होती. ती संपल्याचे आंबेडकर यांनीच जाहीर केल्याने आता एमआयएमनेदेखील वंचितकडे युतीसाठी हात पुढे केलेला नाही. त्यामुळे एकंदरीत पाहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) ‘एकला चलो रे’ म्हणत एकट्यानेच निवडणूक लढवावी लागेल, असे दिसते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.