आता प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; चर्चेला उधाण  

143

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सध्या भेटीगाटीवर जोर दिला आहे. त्यांच्यासाठी कुठला पक्ष, गट सध्या अस्पृश्य नाही. मागील दोन महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत होते, शिवसेनेशी युती करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी प्रकाश आंबेडकर अचानक मंत्रालयात गेले आणि सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यामुळे लागलीच प्रकाश आंबेडकरांचे नाव शिंदे गटाशी जोडायला सुरुवात झाली आहे.

तर्कवितर्क सुरु 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर मंत्रालयात पोहोचले. मात्र दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याची माहिती समोर आलेली नाही. पण मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात ही भेट असल्याचे बोलले जात आहे. तसेच दोघांमध्ये राजकीय चर्चा होण्याचीही दाट शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर आले होते. त्यानंतर आगामी पालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरेंच्या गटासोबत युती करेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये याबाबतची प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली होती. यातच आता प्रकाश आंबेडकर थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा चीनच्या वेबसाईट केल्या हॅक, ‘बोलो पावभाजी’ चर्चेत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.