शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी वादाला सुरुवात! उद्धव ठाकरे करतील का खुलासा?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षीही बंदीस्त स्वरूपात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना अनेक विषयांच्या खुलासा करावा लागणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही बंदीस्त सभागृहात होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. परंतू या मेळाव्याच्या आधीच विविध वाद आता या मेळाव्याला चिकटू लागले आहेत. हे वाद पक्षातील आणि पक्षाबाहेरचेही आहेत. या सर्व वादांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतात, हे पहाणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

कोणते आहेत वाद?

  • ज्या दिवशी शिवसेना नेते संजय राऊत यांनी यंदाचा सेनेचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार, असे घोषित केले, तेव्हा मनसेचे नेते अमेय खोपेकर यांनी याला पहिला विरोध केला. राज्य सरकारने जर नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर मग १५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याला नाट्यगृहात परवानगी कशी मिळाली? जर दसरा मेळावा १५ ऑक्टोबर रोजी होणार असेल, तर मग नाट्यगृहे त्या दिवशी का सुरू होऊ शकत नाहीत?, असा प्रश्न उपस्थित केला. ज्या मेळाव्याला उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून संबोधित करणार आहेत, त्याच मेळाव्याला ठाकरे यांनी परवानगी कशी दिली?, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. याचे उत्तर उद्धव ठाकरे यांना द्यावे लागणार आहे.
  • शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा षण्मुखानंद नाट्यगृहामध्ये भरवण्यात येणार आहे. तिथे ठाकरे सरकारच्या नियमानुसार ५०% उपस्थिती असणार आहे का? राज्यात नाट्यगृह आणि सिनेमागृहांना २२ ऑक्टोबरपासून परवानगी असताना सत्ताधारी पक्ष म्हणून १५ ऑक्टोबरची विशेष सवलत का? सत्ताधाऱ्यांना नियम कायदे का लागू नाहीत?, असे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

(हेही वाचा : ‘दोन वर्षांत मनात साचलेलं तुम्हाला सांगायचं आहे’… दसरा मेळाव्यात पंकजाताई काय बोलणार?)

  • शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते, मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील कागदपत्रे भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचे समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून पक्षांतर्गत पराकोटीचे मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे कदम यांना यंदाच्या मेळाव्यात व्यासपीठावर स्थान दिले जाणार नाही, अशी चर्चा आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. यावर उद्धव ठाकरे काय बोलतात हे पहावे लागणार आहे.
  • सध्या सेनेच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी जाहिररीत्या नाराजी व्यक्त केली होती. सेनेने भाजपाशी युती करावी आणि आमच्या मागचा चौकशीची ससेमिरा संपवा, असे म्हटले, याचे उत्तरही उद्धव ठाकरे देणार का, हे पहावे लागेल.
  • चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोडक्यात त्याचा प्रतिवाद केला. उद्धव ठाकरे त्याचा सविस्तर खुलासा करण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here