युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सावली, अशी ओळख असलेले वरुण सरदेसाई सध्या पक्ष, सोशल मीडिया आणि माध्यमांच्या नजरांपासून दूर झाल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर वरुण जवळपास अदृश्यरुपात वावरत आहेत. त्यामुळे ते स्वतःहून शिवसेनेपासून लांब गेले, की जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आले, असेही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
( हेही वाचा : १५ ऑगस्टपासून राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा’)
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पक्ष वाचवण्यासाठी स्वतः उद्धव आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवाय दूरचित्रवाणी, ट्विटर, फेसबुकसह विविध माध्यमांतून पक्षाचे नेते, पदाधिकारी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. कोल्हापूरसह ठिकठिकाणी जोरदार आंदोलनेही सुरू आहेत. पण युवा सेनेचा आक्रमक चेहरा असलेले वरुण सरदेसाई या सर्वांत कुठेही सक्रीय दिसत नाहीत.
याविषयी शिवसेनेतील काही जुन्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता, त्यांनी खासगीत सांगितले की, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर वरुण सरदेसाई यांचा पक्षासह शासकीय कारभारातील हस्तक्षेप वाढला होता. मंत्रीपदी नसतानाही ते सरकारी बैठकांना हजेरी लावत. अनेक महत्त्वाच्या फाईल्स, टेंडर ‘वरुणमार्गे’ पास व्हायचे. त्यामुळे कानामागून येत तिखट झालेल्या ठाकरेंच्या या पाहुण्याविषयी आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. शिंदे सोबत गेलेल्या अनेक आमदारांनी याविषयी उद्धव आणि आदित्य यांच्याकडे तक्रारी केल्या; पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या कारभारासह अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला लक्ष्य केले जात असताना, त्यात वरुण सरदेसाई यांना पुढे केल्यास शिंदे गटाच्या हाती आयते कोलित देण्यासारखे आहे. त्यामुळेच वरुण सरदेसाई यांना काही काळ शांत राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जूननंतर एकही ट्वीट नाही
ऐरवी सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असलेल्या वरुण सरदेसाई यांनी १५ जूननंतर ट्विटर वा फेसबुकवर एकही पोस्ट केलेली नाही. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर घडलेल्या घडामोडींदरम्यान ते एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘तेजस’मुळे वरुण बाजूला?
वरुण सरदेसाई हे नात्याने आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. युवासेनेची जबाबदारी आदित्यकडे आल्यानंतर वरुण यांचे पक्षातील वजन वाढत गेले. ते युवासेनेचे सचिवही बनले. आदित्य यांच्याकडे मंत्रिपद आल्यानंतर वरुण सरदेसाई युवासेनेचे प्रमुख होतील, अशी अटकळ बांधली जात होती. पण ठाकरे कुटुंबीयांकडून तेजस यांना राजकारणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याने, वरुण आडोशाला गेलेत का, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community