पक्षवाढीसाठी युवासेना मैदानात, हा चेहरा ठरतोय लक्षवेधी

युवासेनेचा एक चेहरा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राज्यभर या युवा नेत्याने झंझावाती दौरे सुरू केले असून, त्यांच्या दौऱ्यांना प्रतिसाद देखील मिळत आहे.

राज्यात कोरोनाचे संकट असले तरी सध्या सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे, ते आगामी पालिका निवडणुकांकडे. 2022 हे वर्ष निवडणुकांचे ठरणार आहे. याचमुळे सध्या सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी मनसे यांचे दौरे देखील सुरू झाले आहेत. मात्र, सध्या या सर्व पक्षांपेक्षा सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सत्ताधारी शिवसेनेकडे. सत्तेत असलेली शिवसेना कशा पद्धतीने पक्षबांधणी करत आहे, निवडणुकीसाठी काय रणनीती आखत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या शिवसेना वाढीसाठी आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने कंबर कसली असून, युवासेनेचा एक चेहरा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राज्यभर या युवा नेत्याने झंझावाती दौरे सुरू केले असून, त्यांच्या दौऱ्यांना प्रतिसाद देखील मिळत आहे.

हा चेहरा वेधतोय सर्वांचे लक्ष

वरूण सरदेसाई.. सध्या या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी युवा सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा आता वरुण सरदेसाई यांच्याकडे जाणार, अशी चर्चा सुरू झाली आणि वरुण सरदेसाई पुन्हा चर्चेत आले. मात्र आता वरुण यांनी महाराष्ट्रभर सुरू केलेल्या दौऱ्यामुळे देखील त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरुण सरदेसाई यांचा पदाधिकारी संवाद सुरू असून, या माध्यमातून वरुण सरदेसाई पक्ष संघटना वाढवताना दिसत आहेत.

(हेही वाचाः शिवसेनेचे ‘युवा’ बेजबाबदार)

आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी

वरुण सरदेसाई हे ठाकरे कुटुंबाच्या अतिशय जवळचे आहेत. आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांचाकडे पाहिले जाते. आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह पहिल्यांदा वरुण सरदेसाई यांनी धरला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.

म्हणून वरुण होऊ शकतात युवासेना अध्यक्ष?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर, ते सध्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे युवासेना प्रमुखपदी आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. जर युवासेनेचे प्रमुखपद वरुण सरदेसाईंकडे गेले, तर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेर इतरांना महत्वाचे पद मिळेल.

(हेही वाचाः ट्विटरवर निर्माण झाले अनेक राहुल गांधी… काय आहे कारण?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here