एकनाथ शिंदे… राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे पॉवरफुल नेते.. शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा स्वतःकडे ठेवली आणि नंबर दोनचे नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडले. मात्र आता याच एकनाथ भाईंच्या खात्यात ‘वरुण’ लुडबुड करू लागला असून, या वरुणमुळे चक्क एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता हे वरूण कोण एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. हे वरुण दुसरे तिसरे कोणी नसून, आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आणि सध्या विरोधकांच्या रडारवर असलेले वरुण सरदेसाई आहेत. गेल्या काही दिवसांत या वरुण सरदेसाई यांची शिवसेनेत इतकी लुडबुड वाढू लागली की, आता तर त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या खात्यातच लुडबुड करायला सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांच्या नगरविकास खात्यातील सर्व हालचालींवर वरुण सरदेसाई लक्ष देत असल्याचे मंत्रालयात दबक्या आवाजात बोलले जात आहे.
कोणाच्या सांगण्यावरुन वाढली लुडबुड?
गेल्या काही दिवसांत शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांचे खच्चीकरण सुरू असल्याची चर्चा आहे. याचाच प्रत्यय नुकताच बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान आला. शिवसेनेत नंबर दोनचे खाते असलेल्या एकनाथ शिंदे यांचे निमंत्रण पत्रिकेवर साधे नाव देखील छापण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यामुळे नगरविकास खात्यात वरुण यांची लुडबुड कोणाच्या सांगण्यावरुन तर वाढली नाही ना? असा सूर आता शिंदे समर्थकांमध्ये उमटू लागला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाजपला असलेला सॉफ्ट कॉर्नर तर शिवसेना नेतृत्वाला खूपत नाही ना आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत नाही ना, अशी देखील दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली आहे.
(हेही वाचाः राठोड प्रकरणात ‘शिंदे’ गटाला शिवसेनेत शह देण्याची ‘भावना’?)
याआधीही वरुण सरदेसाई बैठकांना लावत हजेरी
राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत वरुण सरदेसाई बैठकांना हजेरी लावत असल्याचे समोर आले होते. यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वरुण सरदेसाई बैठकांमध्ये दिसेनासे झाले. मात्र आता पुन्हा एकदा वरुण सरदेसाई हे खुद्द नगरविकास मंत्र्यांच्या खात्यामध्ये लुडबुड करत असल्याची चर्चा आहे.
आधीच युवा सेनेच्या लुडबुडीमुळे ज्येष्ठ शिवसैनिक नाराज
सगळ्यात महत्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत युवा सेनेची शिवसेनेमध्ये लुडबुड वाढत चालल्याने जुने-जाणते शिवसैनिक नाराज आहेत. त्यात आदित्य ठाकरे मंत्री झाल्यापासून वरुण सरदेसाई, राहुल कनाल यांचा मंत्रालयात देखील वावर वाढला आहे. आता तर थेट एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यात लुडबुड करण्यापर्यंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मजल गेली आहे.
(हेही वाचाः युवासेनेची लुडबुड थांबणार!)
नितेश राणेंचाही सरदेसाई यांच्यावर आरोप
गेल्या काही दिवसांत वरुण सरदेसाई हे सातत्याने चर्चेत आहेत. नुकतेच भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचं रॅकेट चालतं. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन केला होता आणि त्यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी केली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केला होता. सचिन वाझेंकडून बेटिंगवाल्यांना धमकावण्यात आले. त्यांच्यावरील छापा किंवा अटक टाळायची असेल तर तुम्हाला 150 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला होता. सचिन वाझे यांनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असं सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचा म्हणजे एकप्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणेंनी केला होता. तसेच नितेश राणे यांनी फक्त आरोपच केला नाही तर, वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण तपासण्याची मागणी नितेश राणे यांनी केली होती. वरुण सरदेसाई यांच्या कॉलचे सीडीआर एनआयएने तपासावे, असे देखील नितेश राणे यांनी म्हटले होते.
कोण आहेत वरुण सरदेसाई?
वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. ते पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता.
(हेही वाचाः स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकः भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंना स्थान नाही! राणेंनी व्यक्त केले आश्चर्य)
Join Our WhatsApp Community